महापौर दाम्पत्याचे कोंबडपाड्यावर वर्चस्व कायम

महापौर दाम्पत्याचे कोंबडपाड्यावर वर्चस्व कायम

Published on

भिवंडी, ता. १८ (वार्ताहर) : भिवंडी महापालिका निवडणुकीत सर्व शहराचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग क्रमांक १ (गोकुळनगर, कोंबडपाडा, संगमपाडा व म्हाडा कॉलनी) या अत्यंत लक्षवेधी प्रभागावर कोणार्क विकास आघाडीचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महापौर दाम्पत्य म्हणून ओळख असलेले विलास आर. पाटील व प्रतिभा विलास पाटील यांनी या प्रभागात विजय मिळवत आपली राजकीय पकड कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत त्यांचा मुलगा अ‍ॅड. मयुरेश पाटील ‘जायंट किलर’ ठरला असून आमदारांच्या पुत्राचा पराभव हा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
१९९१ पासून कोंबडपाडा-गोकुळनगर विभागाचे नेतृत्व विलास पाटील करत आहेत. तेव्हापासून सलग सात वेळा विजय मिळवत त्यांनी येथे ‘डबल हॅट्‌ट्रिक’ साधली आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा पाटील यांनी २०१२ पासून सलग तिसरा विजय मिळवत ‘हॅट्‌ट्रिक’ पूर्ण केली आहे. महापालिका स्थापन झाल्यापासूनच्या २० वर्षांच्या कालावधीत दहा वर्षे सत्ता कोणार्कच्या ताब्यात राहिली आहे. कधी विलास पाटील तर कधी प्रतिभा पाटील यांनी महापौर पद भूषवले आहे. या निवडणुकीत आमदार महेश चौघुले यांनी ही लढत प्रतिष्ठेची बनवत आक्रमक प्रचार केला. प्रचारादरम्यान आचारसंहिता भंग, हाणामारी व शिवीगाळ प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले होते. मतदानाच्या दिवशी परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे तणावपूर्ण शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. अ‍ॅड. मयुरेश पाटील यांनी ७,४६९ मते मिळवत आमदार पुत्र मित चौघुले यांचा १,६९५ मतांनी पराभव केला. या विजयामुळे मयुरेश पाटील या लक्षवेधी लढतीतील ‘जायंट किलर’ ठरले असून कोंबडपाडा परिसरातील पाटील कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.


प्रभागातील जनाधार
सुशिक्षित व्यापारी समाजासह मध्यमवर्गीय मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असलेल्या या प्रभागात विलास पाटील यांनी स्वतंत्र असा भक्कम चाहता वर्ग निर्माण केला आहे. या जनाधाराच्या बळावर ते आजवर सत्तेपर्यंत पोहोचत आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत या प्रभागात आमदार महेश चौघुले यांनी आपला मुलगा मित चौघुले यांना विलास पाटील यांचा मुलगा मयुरेश यांच्या विरोधात उमेदवार म्हणून उभे करत कडवे आव्हान दिले होते. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची व लक्षवेधी ठरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com