उल्हासनगरात ३९,२२२ मतदारांचा ‘नोटा’स्त्र
उल्हासनगरात ३९,२२२ मतदारांचा ‘नोटा’स्त्र
मतपेटीतून संतापाचा उद्रेक
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : लोकशाहीच्या रणांगणात या वेळी उमेदवारांपेक्षा मतदारांची नाराजीच अधिक ठळक ठरली. उल्हासनगर महापालिका निवडणूक २०२६ मध्ये मतदारांनी ‘नोटा’चा कौल देत राजकीय पक्षांना थेट आरसा दाखवला. तब्बल ३९,२२२ नोटा मतांमधून “आमचा पर्याय तुम्ही नाही” असा रोखठोक संदेश देत, अनेक प्रभागांत निकाल उलटवू शकणारी नाराजी उघडपणे समोर आली.
उल्हासनगर महापालिका निवडणूक २०२६ ही केवळ विजयी उमेदवारांची यादी नव्हे, तर मतदारांच्या मनातील खदखद मांडणारी ठळक राजकीय नोंद ठरली. प्रभाग क्रमांक १ ते २० मधील अ, ब, क आणि ड या सर्व जागांचा एकत्रित विचार करता तब्बल ३९,२२२ नोटा मते नोंदली गेली. हा आकडा शहरातील राजकारणासाठी गंभीर आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारा आहे.
प्रभागनिहाय पाहता प्रभाग १३ मध्ये सर्वाधिक ३,९२१ नोटा नोंदल्या गेल्या, तर प्रभाग २० मध्ये सर्वात कमी ८५७ नोटा पडल्या. याशिवाय प्रभाग ११ मध्ये २,७५९, प्रभाग ६ मध्ये २,५५३, प्रभाग १२ मध्ये २,२१५ आणि प्रभाग ८ मध्ये २,०२२ नोटा मतांनी मतदारांचा असंतोष स्पष्टपणे व्यक्त झाला. हे आकडे स्थानिक प्रश्नांची उपेक्षा, उमेदवारांची प्रतिमा आणि पक्षीय कार्यपद्धतीबाबतची नाराजी अधोरेखित करतात.
निवडणुकीतील सर्वाधिक धक्कादायक वास्तव म्हणजे अनेक प्रभागांत विजय आणि पराजयाचा फरक हा नोटा मतांपेक्षा कमी राहिला. प्रभाग ४ (क) मध्ये अवघ्या १६ मतांनी विजय ठरला, तर तेथे २५१ नोटा नोंदल्या गेल्या. प्रभाग ७ (अ) मध्ये ३८ मतांनी विजय मिळाला असतानाही ३१५ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. प्रभाग ९ (अ) मध्ये २०९ मतांच्या फरकाच्या तुलनेत ४९७ नोटा पडल्या. प्रभाग १५ (ड) मध्ये अरुण आशान यांनी भाजपचे धनंजय बोडारे यांचा फक्त १६४ मतांनी पराभव केला; मात्र या प्रभागातही ५७९ नोटा नोंदल्या गेल्या.
आत्मपरीक्षणाची वेळ
स्थानिक प्रश्नांची उपेक्षा, उमेदवारांची डागाळलेली प्रतिमा आणि प्रस्थापित पक्षीय कार्यपद्धती यामुळे मतदारांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे या आकडेवारीवरून सिद्ध होते. राजकीय अभ्यासकांच्या मते, ही सर्वच पक्षांसाठी ‘धोक्याची घंटा’ आहे. आगामी काळात जनतेशी प्रामाणिक संवाद आणि विश्वासार्ह नेतृत्व न दिल्यास, ‘नोटा’चा हा आवाज अधिक प्रखर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रभागनिहाय ‘नोटा’ मते
प्रभाग क्रमांक नोटा मते प्रभाग क्रमांक नोटा मते
प्रभाग १ १,९९७ प्रभाग ११ २,७५९
प्रभाग २ २,०२७ प्रभाग १२ २,२१५
प्रभाग ३ २,०२६ प्रभाग १३ ३,९२१ (सर्वाधिक)
प्रभाग ४ १,१९२ प्रभाग १४ १,९३७
प्रभाग ५ १,७३१ प्रभाग १५ १,९१३
प्रभाग ६ २,५५३ प्रभाग १६ २,०६४
प्रभाग ७ १,६०४ प्रभाग १७ १,९९६
प्रभाग ८ २,०२२ प्रभाग १८ १,८७३
प्रभाग ९ १,३७४ प्रभाग १९ १,८४१
प्रभाग १० १,३१० प्रभाग २० ८५७ (सर्वात कमी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

