ठाणे महापालिकेत ‘ती’चा आवाज
ठाणे महापालिकेत ‘ती’चा आवाज
६९ रणरागिणींनी लुटले विजयाचे वाण; शिवसेनेच्या सर्वाधिक ४० नगरसेविका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी संपली असून, आता नगरसेवक म्हणून ठाणेकरांच्या सेवेत रुजू होण्याची जबाबदारी १३१ नगरसेवकांच्या खांद्यावर आहे. यामध्ये पुरुष नगरसेवकांच्या खांद्याला खांदा लावून यंदा तब्बल ६९ रणरागिणी आपली कामगिरी बजावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ५० टक्के आरक्षणापेक्षाही जास्त जागांवर महिला उमेदवार निवडून आल्या आहेत; मात्र विशेष म्हणजे शिंदे गटाच्या निवडून आलेल्या ७५ नगरसेवकांपैकी ४० महिला आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सभागृहामध्ये ‘ती’ चाच आवाज घुमणार आहे.
ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांतील १३१ नगरसेवकपदांसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडून १६ जानेवारीला निकाल जाहीर झाला. निवडणुकीत ५० टक्के आरक्षानुसार ६६ जागा या महिलांसाठी राखीव होत्या. त्यामुळे सर्वच पक्षांनी महिला कार्ड खेळत रणरागिनींना मैदानात उतरवले. यामध्ये अपक्ष उमेदवारांची संख्याही लक्षणीय होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सुमारे ६४१ पैकी २९५ महिला उमेदवार रिंगणात होत्या. राखीवच नव्हे, तर सर्वसाधारण गटातही महिला उमेदवारांनी चांगली लढत दिली. या लढतीला चांगले यश आले आहे. राखीव जागांवर महिला उमेदवार निवडून आल्या आहेत, पण सर्वसाधारण गटातही त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे एकूण महिला नगरसेवकांची संख्या ६९ पर्यंत पोहोचली आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे पुन्हा मोठ्या ‘हिमती’ने निवडून आल्या आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक यांनीही विजय मिळवला आहे. शिवसेना सचिव, माजी नगरसेवक यांच्या पत्नी आधीच बिनविरोध निवडून आल्या. शिंदे गटाने निवडणुकीत उतरवलेल्या बहुतेक सर्वच माजी नगरसेविका चांगल्या मताधिक्यांनी निवडून आल्या आहेत, पण त्या जोडीलाच स्नेहा मढवीसह नवीन चेहऱ्यांनाही निवडून आणले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटानेही माजी नगरसेविकांसह पदाधिकाऱ्यांच्या पत्नींना संधी दिली होती. भाजपच्याही माजी नगरसेविकांसह काही नवीन चेहरे निवडून आले आहेत. शिंदे गटाने तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या प्रमिला केणी या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यामुळे एकमेव विजयी अपक्ष उमेदार ठरल्या आहेत.
तुलनेत एक जागा कमी
२०१७ मध्ये १३१ पैकी ७० महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या. त्या तुलनेत २०२६ मध्ये महिला नगरसेविकांची संख्या एकने कमी झाली आहे; मात्र तरीही निम्म्याहून अधिक जागा मिळवण्यात महिलांना यश आले आहे.
एक नजर
- २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या ६७ पैकी ३६ महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या.
- भाजपच्या २३ पैकी १२ नगरसेविका विजयी झाल्या.
- राष्ट्रवादीच्या ३४ पैकी २० नगरसेविका निवडून आल्या.
- काँग्रेसच्या ३ पैकी २ महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या.
या पक्षांना भोपळा
काँग्रेसने ६४ पैकी २९, शिवसेना ठाकरे गटाने ५३ पैकी ३३ तर मनसेने २३ पैकी १६ महिला उमेदवार दिले होते. ठाकरे गटाचा एकमेव उमेदवार निवडून आला आहे. मात्र, माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अनंत तरे यांच्या भावजयी महेश्वरी तरे यांची यंदाही संधी हुकली आहे.
सभागृहात महिलाराज
२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत १३१ पैकी ६७ नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेतही ३६ नगरसेविका निवडून आल्या होत्या. यंदाही ही परंपरा कायम राहिली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या निवडून आलेल्या ७५ पैकी ४० महिला नगरसेविका आहेत. त्यामुळे महापालिकेत पुन्हा एकदा महिलाराज अनुभवायला मिळणार आहे.
२०२६ चे चित्र
पक्ष एकूण उमेदवार महिला उमेदवार विजयी महिला उमेदवार
शिवसेना शिंदे गट ८७ ४१ ४०
भाजप ४० २१ १६
राष्ट्रवादी अ.प.गट ६६ ३३ ०४
राष्ट्रवादी श.प.गट ६४ २३ ०६
(एमआयएमच्या दोन तर शरद पवार गट पुरस्कृत अपक्ष एक महिला उमेदवार निवडून आल्या आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

