ठाण्यात क्लस्टर योजनेची सुरुवात
ठाण्यात क्लस्टर योजनेची सुरुवात
खोपट एसटी आगाराच्या जागेवर रहिवासी प्रकल्प; एसटी आगार बाळकुमला स्थलांतरित
राजीव डाके ः सकाळ वृत सेवा
ठाणे शहर, ता. १३ ः ठाणे शहरातील महत्त्वाच्या आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खोपट एसटी आगारावर अखेर क्लस्टर योजनेचा पहिला घाव बसला आहे. खोपट येथील एसटी आगार क्रमांक एक आणि दोन या दोन्ही आगारांच्या सुमारे १० ते ११ एकरांहून अधिक जागेवर लवकरच रहिवासी इमारती उभ्या राहणार असून, या ठिकाणी क्लस्टर योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. एसटी महामंडळाकडून ही जागा अधिकृतपणे क्लस्टर योजनेसाठी हस्तांतरित करण्यात आली असून, दोन्ही आगार बाळकुम येथे स्थलांतरित केले जाणार आहेत, अशी माहिती ठाणे एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.
खोपट आगार क्रमांक एकमधील एसटी बसेस धुण्यासाठी असलेले धुलाई केंद्र तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळील सुरक्षा रक्षकांची चौकी पाडण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात या परिसरातील अन्य संरचनाही हटवण्यात येणार आहेत. या जागेवर आगाराच्या आसपास असलेल्या इमारती व चाळींमधील रहिवाशांसाठी टॉवर उभारले जाणार आहेत. यासाठी आवश्यक ती कायदेशीर जागा हस्तांतरण प्रक्रिया एसटी महामंडळाकडून पूर्ण करून ती ठाणे महापालिका आणि क्लस्टर उपक्रम राबवणाऱ्या महाप्रीत कंपनीकडे वर्ग करण्यात आली आहे. खोपट आगार क्रमांक एक आणि दोनची एकत्रित जागा सुमारे ११ एकर असल्याचे सांगण्यात येते. या परिसरात गेल्या अनेक वर्षांत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली असून, त्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आता एसटीच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या अधिकृत इमारतींमध्ये पुनर्वसन दिले जाणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळ असलेले हे आगार बाळकुम येथे हलवण्यात येत असल्याने, नव्या जागेचे क्षेत्रफळ कमी असून, ती रेल्वे स्थानकापासून लांब आहे. त्यामुळे प्रवासी तसेच एसटी कर्मचाऱ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे असतानाही एसटी प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाबाबत अनेकांकडून आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.
.................
काय आहे क्लस्टर योजना?
महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने शहरांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना राबवली जात आहे. ठाणे शहरात ही योजना ठाणे महापालिका आणि महाप्रीत यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट अँड एरिया इम्प्रूव्हमेंट कंपनी लिमिटेडमार्फत राबवली जाणार आहे. या विशेष कंपनीत महाप्रीतचा ७४ टक्के, तर ठाणे महापालिकेचा २६ टक्के हिस्सा आहे. अनधिकृत आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
...................
खोपट आगार क्रमांक एक आणि दोनच्या जागा क्लस्टरसाठी देण्यात आल्या असून, हे आगार बाळकुम येथे स्थलांतरित केले जाणार आहे. या ठिकाणी रहिवासी इमारती उभारल्या जातील.
- विभागीय अभियंता, राज्य मार्ग परिवहन महामंडळ, ठाणे
..............
फोटो : खोपट आगार क्रमांक एकच्या जागेवर एसटीने बांधलेली बांधकामे तोडली जात असून, येथे लवकरच इमारती उभ्या राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

