खालापूरातील धोकादायक कारखाना बंद करण्याची मागणी
खालापूरातील धोकादायक कारखाना बंद करण्याची मागणी
खालापूर, ता. २१ (बातमीदार) : खालापूर तालुक्यातील खोपोली-पेण मार्गावर नारंगी गावाजवळ असलेल्या एचपी अॅडहेसिव्ह कारखान्याला शनिवारी लागलेली भीषण आग तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, या दुर्घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांचा संताप अनावर झाला असून, नारंगी व आसपासच्या गावांतील नागरिकांनी कारखान्यावर धडक देत धोकादायक कारखाना कायमस्वरूपी बंद करण्याची जोरदार मागणी केली.
मागील आठवड्यात शनिवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास कारखान्यातील रसायनांचे ड्रम ठेवण्यात आलेल्या भागात एअर कंडिशनरचा स्फोट झाला. या स्फोटातून उडालेल्या ठिणग्यांमुळे भीषण आग लागली. कारखान्यात मोठ्या प्रमाणात अती ज्वालाग्राही रसायने साठवण्यात आलेली असल्याने आग काही क्षणातच संपूर्ण परिसरात पसरली. आगीचे लोळ आणि धुरामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. कारखान्यालगतच आदिवासी वाडी व दाट लोकवस्ती असल्याने अनेक नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी जवळच्या डोंगराचा आसरा घेतला. परिस्थिती गंभीर असल्याने जवळपास १५ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. पाणी आणि फोमचा सतत मारा करून अखेर पाच तासांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
या घटनेनंतर रविवारी सकाळपासून नारंगी व आसपासच्या गावांतील ग्रामस्थ, महिला आणि युवक मोठ्या संख्येने कारखान्याच्या प्रवेशद्वारावर जमा झाले. कारखाना व्यवस्थापनाने सरपंच व उपसरपंच यांना हाताशी धरून बेकायदा धोकादायक उत्पादन सुरू ठेवले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. कारखान्यात आवश्यक सुरक्षा साधनांचा पूर्ण अभाव असून, फायर लाईनमध्ये पाण्याचा एक थेंबही नसल्याचे उघडकीस आल्याने नागरिकांचा संताप आणखी वाढला. कारखान्याने सर्व कायदेशीर परवानग्या, सुरक्षा यंत्रणा आणि अग्निशमन व्यवस्था पूर्ण केल्याशिवाय उत्पादन सुरू करू नये, अन्यथा कारखाना चालू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. परिस्थिती चिघळू नये यासाठी खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवली व संतप्त ग्रामस्थांना शांत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

