सभागृहात नात्यांचा गोतावळा

सभागृहात नात्यांचा गोतावळा

Published on

सभागृहात नात्यांचा गोतावळा
ठाणे पालिका निवडणूक ठरली कुटुंबकेंद्रित
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाणे महापालिकेच्या नवनिर्वाचित सभागृहात यंदा केवळ राजकीय समीकरणेच नव्हे, तर नातेसंबंधांचाही खास गोतावळा पाहायला मिळणार आहे. पती-पत्नी, दीर-भावजय, सासू-सून, पितापुत्र आणि जावा-दीर अशा विविध कौटुंबिक नात्यांतून अनेक नगरसेवक सभागृहात दाखल होणार आहेत. एकाच कुटुंबातील चक्क चार जण नगरसेवक म्हणून पालिकेची पायरी चढणार आहेत. त्यामुळे महापालिकेचे राजकारण यंदा ‘कुटुंबकेंद्रित’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाणे महापालिकेची निवडणूक शांततेत पार पडली आहे. मात्र, उमेदवारीवरून वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. अपेक्षेनुसार दिग्गजांनी पत्नी, मलांसह कुटुंबीयांची नावे पुढे केली, पण शिवसेना शिंदे गटाने खासदार नरेश म्हस्के आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मुलाला उमेदवारी नाकारून एक चांगला आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण ही दोन नावे वगळली, तर इतर ठिकाणी सर्वच पक्षांमधून घराणेशाहीचा बोलबाला पाहायला मिळाला. याला विरोध म्हणून बंडखोरांची फौज निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यापैकी बहुतेकांना शांत करण्यात यश आले, तर जे शेवटपर्यंत लढले त्यांना पराभूत करण्यात आले. असे असले तरी आता निकालानंतर निवडून आलेल्या १३१ नगरसेवकांमध्ये एकमेकांच्या नातलगांचाच भरणा लक्षणीय असल्याचे दिसते.

पती-पत्नी जोडीने
प्रभाग क्रमांक १६ मधून शिवसेना शिंदे गटाच्या डॉ. दर्शना जानकर आणि त्यांचे पती योगेश जानकर हे दोघेही विजयी झाले असून, पती-पत्नीची जोडी थेट सभागृहात एकत्र दिसणार आहे. भाजपकडून कृष्णा पाटील आणि त्यांच्या पत्नी नंदा पाटील यांनीही विजय मिळवला असून, आणखी एक दाम्पत्य महापालिकेच्या कामकाजात सहभागी होणार आहे.

दीर-भावजय
प्रभाग क्रमांक १८ मधून जयश्री फाटक बिनविरोध निवडून आल्या असून, त्यांचे दीर राजेंद्र फाटक यांनीही विजय संपादन केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे हे दीर-भावजय महापालिकेत एकत्र काम करताना दिसणार आहेत.

सासू-सून
माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या पत्नी एकता भोईर या प्रभाग क्रमांक १७ मधून बिनविरोध निवडून आल्या असून, सून यज्ञा भोईर प्रभाग क्रमांक १५ मधून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे सभागृहात सासू-सुनेची जोडी पाहायला मिळणार आहे.

भोईर कुटुंबाचा ठसा
भोईर कुटुंबाचा ठसा यंदाच्या निवडणुकीत विशेष ठळक ठरला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या सपना भोईर आणि उषा भोईर या दोन जावा निवडून आल्या आहेत. भोईर कुटुंबातीलच देवराम भोईर आणि संजय भोईर हे पितापुत्रही नगरसेवक झाले आहेत. प्रभाग क्रमांक ८ मध्ये तर भोईर कुटुंबाचे संपूर्ण पॅनेलच निवडून आल्याने या प्रभागात ‘भोईर कुटुंबाचा धबधबा’ पाहायला मिळत आहे.

माय-लेक आणि बाप-लेक
शिवसेना गटाचे मंदार केणी आणि त्यांच्या मातोश्री प्रमिला केणी हे दोघे माय-लेक पुन्हा विजयी झाले आहेत. तसेच माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि त्यांची मुलगी साक्षी मढवी हेही सभागृहात एकत्र दिसणार आहेत. दिवा परिसरातून प्रभाग क्रमांक २८ चे प्रतिनिधित्व रमाकांत मढवी आणि पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवलेली त्यांची कन्या साक्षी मढवी करणार आहेत.

नात्यांचे रंग दिसणार
ठाणे महापालिकेमध्ये पती-पत्नी किंवा नोतेवाईक एकत्रित निवडून येण्याची परंपरा राहिली आहे, पण या वेळी ही संख्या जास्त दिसत आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्दावरून पालिकेचे सभागृह गाजताना नात्यांचे रंगही अनुभवयाला मिळणार आहेत. याशिवाय एकाच पॅनेलमध्ये किंवा जवळच्या प्रभागातील पॅनेलमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य निवडून आल्याने एकाचवेळी दोन प्रभागांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com