अनुभवी चेहऱ्यांना नापसंती

अनुभवी चेहऱ्यांना नापसंती

Published on

अनुभवी चेहऱ्यांना नापसंती
३२ माजी नगरसेवक बसले घरी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : दीर्घकाळ राजकारणात सक्रिय असलेले, दोन-तीन टर्म निवडून आलेले आणि ओळखीची नावे असलेले तब्बल ३२ माजी नगरसेवक या निवडणुकीत पराभूत झाले. यामध्ये माजी महापौरांसह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दोन ते चार टर्म नगरसेवक म्हणून निवडून आलेले मातब्बरही यंदा मतदारांच्या नाराजीमुळे घरी बसले आहेत.

ठाणे महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षाने आपली ताकद पणाला लावली होती. यामध्ये १०० हून अधिक माजी नगरसेवकांना पक्षांनी मैदानात उतरवून संधी दिली होती, तर ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले. काही इतर पक्षांमध्ये आयत्या वेळी गेले. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची ठरली, पण या सर्व लढतींमध्ये तब्बल ३२ माजी नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ओळख, संपर्क आणि अनुभव असूनही या वेळी ते मतदारांना आपल्याकडे वळवू शकले नाहीत. काही प्रभागांमध्ये तर एकाच जागेसाठी तीन-चार माजी नगरसेवक रिंगणात उतरले होते, पण तरीही मतदारराजाने नव्या चेहऱ्यांना संधी देत मातब्बरांना धक्का दिला असल्याचे दिसून आले आहे.

प्रभाग क्रमांक २ मध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेविका कविता पाटील यांचा भाजपचे विकास पाटील यांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक तीन ही निवडणूक विशेष चर्चेची ठरली. येथे मधुकर पावशे, भूषण भोईर आणि जयनाथ पुर्णेकर या तीनही माजी नगरसेवकांना एकाच वेळी पराभव स्वीकारावा लागला. पावशे आणि भोईर यांना शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे ठाणे विकास आघाडीतून त्यांनी निवडणूक लढवली, पण माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी आपली ताकद लावून दोन सामान्य कार्यकर्त्यांना निवडून आणले.

खारेगावातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये सलग चार टर्म नगरसेवक राहिलेले उमेश पाटील यांचा पराभव हा निवडणुकीतील मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नवोदित उमेदवार अभिजित पवार यांनी त्यांचा पराभव करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. प्रभाग क्रमांक ११ मध्ये महेश्वरी तरे यांनाही अपयश आले. २०१७ मध्येही त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा शिवसेना ठाकरे गटाच्या त्या उमेदवार होत्या.

चर्चेतील पराभव

या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे क्रमांक १३ मध्ये माजी महापौर अशोक वैत्ती यांचा पराभव. या प्रभागातून ठाकरे सेनेचा एकमेव नगरसेवक निवडून आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या या प्रभागात मशाल तळपली. झोपडपट्टीबहुल भागातून वैती यांना फटका बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे ठाण्याच्या राजकारणातून विचारे जवळपास हद्दपार झाले आहेत.

यांनाही बसला फटका
प्रभाग क्रमांक १५ मध्ये सुवर्णा कांबळे व केवलादेवी यादव
प्रभाग क्रमांक १६ मध्ये माणिक पाटील
प्रभाग क्रमांक ५ मध्ये रागिनी बैरीशेट्टी
प्रभाग क्रमांक ८ मध्ये लॉरेन्स डिसोझा
प्रभाग क्रमांक ९ मध्ये सुरेखा पाटील
प्रभाग क्रमांक १३ मध्ये संजय दळवी
प्रभाग क्रमांक १८ मध्ये मधुकर होडावडेकर
प्रभाग क्रमांक २० मध्ये मनसेच्या माजी नगरसेविका राजश्री नाईक
कळव्यातील प्रभाग क्रमांक २३ मध्ये मनाली मिलिंद पाटील व विलास गायकर
प्रभाग क्रमांक २४ मध्ये अक्षय ठाकूर
प्रभाग क्रमांक २५ मध्ये रिटा यादव, मंगला कळंबे वर्षा मोरे आणि मनीषा साळवी या चारही माजी नगरसेवकांचा एकाच वेळी पराभव झाला.
प्रभाग क्रमांक २६ मध्ये अनिता किणे व विश्वनाथ भगत
प्रभाग क्रमांक ३० मध्ये ज्येष्ठ नगरसेवक सिराज डोंगरे
प्रभाग क्रमांक ३१ मध्ये मोरेश्वर किणे व महेंद्र कोमुर्लेकर
प्रभाग क्रमांक ३२ मध्ये अशारिन राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com