

उलवे, ता. १९ (बातमीदार) : बामणडोंगरी पश्चिम रेल्वे स्थानकासमोर सध्या मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांचे बेकायदा पार्किंग होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर, तसेच रस्त्यालगत स्पष्टपणे ‘नो पार्किंग’ फलक लावलेले असतानाही शेकडो दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आल्या आहेत.
दररोज रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी, परिसरातील रहिवासी, तसेच व्यावसायिक मोठ्या संख्येने या भागात ये-जा करतात, मात्र दुचाकींच्या लांबच लांब रांगांमुळे वाहतूक कोंडी, तसेच अपघाताची शक्यता आहे. तसेच पादचाऱ्यांना चालण्यास अडचणी निर्माण होत आहेत. स्थानक परिसरात अधिकृत दुचाकी पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे अनेक जण थेट रस्त्यावरच वाहने उभी करत असल्याचे दिसून येते. विशेषतः सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेत परिस्थिती अधिक गंभीर बनते.
नो पार्किंग झोन असूनही वाहतूक पोलिस किंवा संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. क्वचितच कारवाई झाली तरी ती तात्पुरती ठरते आणि काही वेळातच पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते. रेल्वे स्थानकाजवळ कायमच अशीच अवस्था असते. स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.