डोंबिवलीत राष्ट्र सेविका समितीच्या पथसंचलनात शिस्त,

डोंबिवलीत राष्ट्र सेविका समितीच्या पथसंचलनात शिस्त,

Published on

शिस्त, आत्मविश्वास आणि शक्तीचे दर्शन
डोंबिवलीत राष्ट्र सेविका समितीचे पथसंचलन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ ः पथसंचलनात चालणे म्हणजे साधना, आत्मविश्वास आणि शक्तीचे प्रतीक असून, ते अभिमान व गौरवाचा भाग आहे, असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सह-कार्यवाहिका चित्रा जोशी यांनी केले. राष्ट्र सेविका समितीच्या ९० व्या वर्षपूर्तीनिमित्त डोंबिवली येथे ठाणे जिल्हास्तरीय सेविकांच्या पथसंचलन पार पडले. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
पथसंचलनात अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, ठाणे व डोंबिवली येथून आलेल्या सुमारे ४६३ गणवेशधारी सेविका सहभागी झाल्या होत्या. समितीच्या ९०व्या वर्षात पदार्पणानिमित्त कोंकण प्रांतात एकाच वेळी १२ ठिकाणी अशा प्रकारची पथसंचलने आयोजित करण्यात आली होती. योग्य ताल, समान गती, अनुशासन आणि एकसारखा गणवेश यातून प्रकट होणारी संघटित शक्ती पाहणाऱ्याला आकर्षित करते. हे सम्यक वर्तन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आवश्यक आहे, असे मार्गदर्शन चित्रा जोशी यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून निवृत्त शासकीय लेखाधिकारी जयश्री पंडित उपस्थित होत्या. संस्कारातून व्यक्ती घडते आणि व्यक्तीतून समाज घडतो. राष्ट्र सेविका समिती हे संस्काराचे केंद्र आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
डोंबिवलीतील पथसंचलन द्विधारा पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. एक संचलन मुक्तेश्वर महादेव मंदिर येथून तर दुसरे म्हसोबा चौक, ठाकुर्ली येथून सुरू झाले. दोन्ही संचलने जुने मारुती मंदिर येथे एकत्र आली व महिला समिती शाळेच्या प्रांगणात समारोप झाला. शिस्तबद्ध नियोजन, वेळेचे काटेकोर पालन आणि महिलांचे घोष पथक हे या संचलनाचे प्रमुख आकर्षण ठरले.

नागरिकांकडून पुष्पवृष्टी
पथसंचलनादरम्यान डोंबिवलीकर नागरिकांनी पुष्पवृष्टी व रांगोळ्यांनी सेविकांचे स्वागत केले. कार्यक्रमाला सुमारे ७०० नागरिक उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com