‘पंजा’मुळे ठाकरे गट, शेकापचा विजय

‘पंजा’मुळे ठाकरे गट, शेकापचा विजय

Published on

खारघर, ता. १९ (बातमीदार) : तळोजा आणि खारघर परिसरातील प्रभाग क्रमांक तीनमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे वेगळी वळण घेणारी ठरली. या प्रभागात ठाकरे गट आणि शेकाप उमेदवारांनी काँग्रेसच्या ‘पंजा’ या निवडणूक निशाणीवर निवडणूक लढवल्यामुळे दोन्ही पक्षांचे उमेदवार विजयी झाले आहेत.

महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत नगरसेवकपदी विराजमान झालेले हरेश केणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे प्रभाग क्रमांक तीन परिसरातील गावे आणि वसाहतमधील शेकापची ताकद कमी झाली होती. मात्र, निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी हरेश केणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे या भागात पक्षाची ताकद वाढली. महापालिका निवडणुकीत केणींमुळे शेकापचे नेते या प्रभागात आघाडी करण्यास नव्हते, मात्र वाटाघाटीनंतर महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविण्यास तयार झाले. या प्रभागात जवळपास १८ हजार अल्पसंख्याक मतदार असल्यामुळे प्रभाग क्रमांक तीनमध्ये काँगेसकडून हरेश केणी, लीला कातकरी यांच्यासमवेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रगती पाटील आणि शेकापचे तुषार पाटील यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजयी झाले. एकूणच, तळोजा-खारघर प्रभाग क्रमांक तीनमध्ये काँग्रेसमुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि शेकाप उमेदवारांनी विजय संपादन केला आहे.

‘मशाल’ला ८५ हजार ४९९ मतदारांची पसंती
खारघरमधील प्रभाग क्रमांक चार, पाच आणि सहामध्ये नऊ उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यापैकी लीना गरड आणि उत्तम मोरबेकर हे विजयी झाले आहेत, तर इतर उमेदवारांना आठशे ते अठराशे मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या नऊ उमदेवारांना मशाल चिन्हावर खारघरमधील ८५ हजार ४९९ मतदारांनी मतदान केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com