फळे-भाजीपाला निर्यातीला मिळणार बळ
फळे, भाजीपाला निर्यातीला मिळणार बळ
भिवंडीतील बापगाव येथे टर्मिनल मार्केटला मंजुरी
भिवंडी, ता. १९ (बातमीदार) : फळे आणि भाजीपाला निर्यातीला जागतिक स्तरावर चालना देण्यासाठी भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे मल्टिमॉडेल हब आणि टर्मिनल मार्केट उभारले जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने शनिवारी (ता. १७) या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला मंजुरी दिली असून, या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
हा प्रकल्प जागतिक बँक आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन योजनेअंतर्गत राबविला जाणार आहे. राज्य सरकार बापगाव येथील ९६.८० एकर (७ हेक्टर) जमीन राज्य कृषी पणन महामंडळाला मोफत उपलब्ध करून देणार आहे. या प्रकल्पासाठी ९८.६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मार्केटद्वारे दरवर्षी सुमारे एक लाख टन कृषी उत्पादनांची हाताळणी करणे शक्य होणार आहे.
शेतकऱ्यांना होणारे फायदे
बापगाव हे भिवंडी आणि कल्याणच्या सीमेवर असलेले मध्यवर्ती ठिकाण असल्याने याचा फायदा ठाणे जिल्ह्यासह आसपासच्या सर्व तालुक्यांना होणार आहे. कापणीनंतरचे नुकसान कमी होईल तसेच साठवणूक सुविधेमुळे माल खराब होण्याचे प्रमाण घटेल. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रक्रिया होणार असल्याने थेट निर्यातीचे मार्ग मोकळे होतील. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
मिळणाऱ्या अत्याधुनिक सुविधा
या हबमध्ये केवळ बाजारपेठच नाही, तर निर्यातीसाठी आवश्यक जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतील.
१. प्रक्रिया केंद्र : बाष्प उष्णता प्रक्रिया आणि वनस्पती विकिरण सुविधा
२. साठवणूक : आधुनिक पॅकहाउस आणि शीतगृहांची व्यवस्था
३. प्रक्रिया : आंबा, मसाले आणि पशुखाद्य प्रक्रिया करण्यासाठी विकिरण तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

