पराभूत उमेदवाराच्या मुलाकडून एकाला मारहाण
भाजप उमेदवाराच्या मुलाकडून एकाला मारहाण
भिवंडीत निवडणूक पराभवाचा राग अनावर
भिवंडी, ता. १९ (वार्ताहर) : निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वैमनस्यातून हाणामारीच्या घटनांना सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक २२ मध्ये झालेल्या निसटत्या पराभवाचा राग मनात धरून, पराभूत भाजप उमेदवाराच्या मुलाने आपल्या साथीदारांसह एका तरुणाला घरात शिरून बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना फेणेपाडा येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक २२ मधून भाजपचे उमेदवार श्याम अग्रवाल निवडणूक लढवत होते. अपक्ष उमेदवार नितेश ऐनकर यांनी त्यांचा अवघ्या २१ मतांनी पराभव केला. या पराभवासाठी प्रभाकर रविशंकर प्रजापती यांनी केलेला प्रचार कारणीभूत असल्याचा संशय अग्रवाल यांच्या समर्थकांना होता.
शनिवारी (१७ जानेवारी) दुपारी अडीचच्या सुमारास श्याम अग्रवाल यांचा मुलगा कुशाग्र अग्रवाल, साथीदार प्रवीण पाटील आणि संतोष यादव यांनी प्रभाकर प्रजापती यांच्या घरात प्रवेश केला. तू अपक्ष उमेदवाराचा प्रचार का केलास? असे विचारत त्यांनी प्रजापती यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि ‘तुला बघून घेऊ,’ अशी धमकी देत परिसरात दहशत पसरवली.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
हल्ल्यात जखमी झालेल्या प्रभाकर प्रजापती यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशाग्र अग्रवाल, प्रवीण पाटील आणि संतोष यादव या तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

