महाप्रकल्पांविरोधात आक्रोश
महाप्रकल्पांविरोधात आक्रोश
जिल्हाधिकारी कार्यालयावर कष्टकऱ्यांची धडक
पालघर, ता. १९ ः जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर, रिलायन्स टेक्सटाईल पार्क, वाढवण विमानतळ आणि ‘चौथी मुंबई’ अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येत आहेत, पण या प्रकल्पांमुळे अस्तित्वावर गदा येणार असल्याने हजारो मच्छीमार, कष्टकरी, आदिवासींमध्ये प्रचंड जनआक्रोश आहे.
प्रकल्पामुळे समुद्र, जंगल, शेती आणि जमिनीचे नुकसान, पर्यावरणाचा ऱ्हास आणि स्थानिकांचे विस्थापन होणार आहे. याविरोधात मंगळवारी नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच मोर्चा काढला. या वेळी मोर्चेकऱ्यांनी ‘बंदर नको, विनाशकारी प्रकल्प नको, दलाल हटाओ जमीन बचाव वाढवण बंदर तत्काळ रद्द करा, अशा आक्रमक घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. आंदोलनात मच्छीमारी, आदिवासी समाजातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. डोक्यावर टोपल्या, हातात फलक घेत घोषणाबाजी करताना महिलांनी आंदोलनाला धार दिली. या वेळी विकासाच्या नावाखाली आमचे जगणं हिरावू नका, अशी ठाम भूमिका महिलांनी आंदोलनाच्या माध्यमातून मांडली.
-----------------------------------------
बोईसर-पालघर रस्ता ठप्प
- बोईसर-पालघर मुख्य रस्ता मोर्चामुळे तब्बल पाच ते सहा तासांहून अधिक काळ ठप्प होता. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोळगाव मार्गे पुढे बोईसर अशी वाहतूक वळवण्यात आली होती. पालघर जिल्ह्यातील १० ते १५ हजार आंदोलक सहभागी झाले.
- आंदोलनासाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालय, परिसरासाठी ६०० च्या जवळपास पोलिस अधिकारी कर्मचारी मोर्चासाठी बंदोबस्ताला होते, तर राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या.
-------------------------------------
अस्तित्वाचा लढा
पारंपरिक मच्छीमारी, शेती, आदिवासी संस्कृती नष्ट होण्याचा धोका असल्याचे सांगत लोकसंमतीशिवाय कोणताही प्रकल्प मंजूर होऊ देणार नाही, असा इशारा या वेळी आंदोलकांकडून देण्यात आला. शासन-प्रशासनाने प्रस्तावित प्रकल्प तत्काळ रद्द केले नाहीत, तर जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. तसेच हा लढा वाढवण बंदरापुरता मर्यादित नसून, पालघरच्या अस्तित्वाचा असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
--------------------------------
भूमिपुत्रांना नष्ट करण्याचा या सरकारचा हा डाव आहे. अनेक विनाशकारी प्रकल्प जिल्ह्यावर लादून जिल्हा नेस्तनाबूत करण्याचा प्रकार सुरू आहे. सरकारने कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा वाढवण बंदर बनवण्याचा संकल्प हाणून पाडला जाईल.
- वैभव वजे, सचिव, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती
--------------------------------
आमच्या हक्कासाठी लोकशाहीने आंदोलन करत आहोत. तरी मोठा पोलिस बंदोबस्त लावून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर हे लोकशाहीला अशोभनीय असे कृत्य आहे. आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार.
- रामकृष्ण तांडेल, नॅशनल फिश वर्कर फोरम
़़़़़़़ः-------------------------------
चौथी मुंबई आणून ग्रामीण भागाचे रूपांतर शहरी भागात केले जात आहे. पेसा कायदा नष्ट करण्याचा डाव सरकार आखत आहे. त्यामुळे येथील जमिनी दलालांनी नष्ट करायला लावल्या आहेत, पण हा लढा कोणत्याही परिस्थितीत जिंकणार आहे.
- ब्रायन लोबो, कष्टकरी संघटना

