महिसदरा कालव्यातील पाणी सोडण्यास विलंब
महिसदरा कालव्यातील पाणी सोडण्यास विलंब
गोवेतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती
रोहा, ता. १८ (बातमीदार) : तालुक्यातील कोलाड परिसरातील गोवे गावातील शेतकऱ्यांना महिसदरा कालव्याद्वारे मिळणाऱ्या पाण्याची निश्चित डेडलाइन पाटबंधारे विभागाकडून चुकविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे वाढती महागाई शेतकरी व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडत असताना, दुसरीकडे पाण्याअभावी भातशेती धोक्यात आली असून, या परिस्थितीस जबाबदार कोण, असा सवाल शेतकरीवर्ग उपस्थित करीत आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगत कुंडलिका नदीच्या उजव्या तीरावरील कालव्यातून महिसदरा कालव्याच्या माध्यमातून पुई व गोवे गावातील शेतकऱ्यांच्या भातशेतीस अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा केला जात होता. या पाण्याच्या आधारे शेतकरी उन्हाळी भातशेतीचे यशस्वी उत्पादन घेत होते. मात्र, गेल्या वर्षी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान पाणीपुरवठा करणारा चेंबर व पुढील मोरी तोडण्यात आल्याने शेतीचा पाणीपुरवठा खंडित झाला. या प्रकाराविरोधात गोवे गावातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करत रस्त्यावर उतरून निषेध केला होता. त्या वेळी महामार्ग ठेकेदार व पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी मोरीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे तसेच उर्वरित कालव्याचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मोरीचे काम झाले असले तरी काही ठिकाणचे पाइपलाइन व अन्य दुरुस्तीची कामे अद्याप प्रलंबित आहेत. सलग दोन वर्षे अतिवृष्टी व पाण्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जर तातडीने पाणी सोडण्यात आले नाही, तर पाटबंधारे विभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गोवे ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र पोटफोडे यांनी केली आहे.
...........
मशागतीची कामे पूर्ण
यंदा पाणी सोडले जाईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी गवत काढणे, मशागत आदी पूर्वतयारीची कामे पूर्ण केली. गोवे ग्रामपंचायतीने २६ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन देऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती. १० ते १५ जानेवारीदरम्यान पाणी सोडले जाईल, असे आश्वासन पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले होते. मात्र, २० दिवस उलटूनही कालव्यात पाणी सोडण्यात आलेले नसल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण आहे.

