निवृत्ती वेतनधारकांचा आंदोलनाचा इशारा
निवृत्तिवेतनधारकांचा आंदोलनाचा इशारा
पंचायत समिती कार्यालयावर देणार धडक
वाडा, ता. १९ (बातमीदार) : निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या मागण्यांकडे गटविकास अधिकारी टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ येत्या बुधवारी (ता. २१) वाडा पंचायत समिती कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन छेडण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य निवृत्तिवेतनधारक संघटना, पालघर शाखेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे.
निवृत्तिवेतनधारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांना संघटनेमार्फत वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला, पण त्यावर अद्याप कोणतेही उत्तर न मिळाल्याची माहिती संघटनेच्या वतीने काढलेल्या एका परिपत्रकात देण्यात आली आहे. सेवानिवृत्तीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महिन्यातून एकदा तालुका पातळीवर ‘ निवृत्तिवेतन अदालत’ घेणे गरजेचे आहे, मात्र तशाप्रकारची कोणतीच प्रक्रिया होत नसल्याचेही परिपत्रकात सांगण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ येत्या २१ तारखेला पंचायत समिती कार्यालसमोर हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. एन. पाटील, जिल्हा सरचिटणीस डी. डी. पाटील, तालुकाध्यक्ष सुनील मोरे व तालुका सचिव अरुण ठकेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

