नवनिर्वाचित नगरसेवकांची कार्यकर्त्यांसह धार्मिक यात्रा
तुर्भे, ता. १९ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी सर्वप्रथम देवदर्शन आणि धार्मिक यात्रेकडे धाव घेतल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. प्रचाराच्या धावपळीत व निकालाच्या तणावात मनोमन केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अनेक नवनिर्वाचित नगरसेवक, त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते नवस फेडण्यासाठी नजीकच्या तसेच शहराबाहेरील मंदिरांमध्ये दाखल झाले. यामुळे शहरातील प्रमुख देवस्थाने, मंदिर परिसर आणि धार्मिक स्थळांमध्ये भाविकांची गर्दी वाढली आहे.
विजय मिळाल्यास देवाता नवस फेडू, असा संकल्प अनेक उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी केला होता. निकाल जाहीर होताच काही उमेदवार थेट मंदिरात जाऊन अभिषेक, महाआरती, नारळ फोडणे, पायी प्रदक्षिणा घालणे तसेच अन्नदान, वस्त्रदान, महाप्रसाद वाटप अशा विविध धार्मिक विधींनी नवसपूर्ती करीत आहेत. काहींनी तर अक्कलकोट, शिर्डी, जेजुरी, एकवीरा याशिवाय आपल्याला कुलदेवतेच्या देवदर्शनाला जाण्याचा संकल्प पूर्ण केला. निकालानंतर शनिवार, रविवार सुट्टीचे दिवस असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा मोर्चा धार्मिक ठिकाणी जात आहे. त्यामुळे राज्यातील विविध मंदिरांमध्ये विजयी उमेदवार व समर्थकांची दर्शनासाठी ये-जा सुरू आहे.
नवनिर्वाचित नगरसेवकांच्या मते, निवडणूक ही जनतेची परीक्षा असते. जनतेने दिलेल्या विश्वासामुळेच आज विजय मिळाला. या विजयाचे श्रेय देवाचा आशीर्वाद आणि मतदारांच्या प्रेमाला आहे. त्यामुळे सर्वप्रथम देवदर्शन करून शब्द पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. अनेकांनी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाहीही दिली.
मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त
मंदिरांमध्ये वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक सुरळीत राहावी, यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या. धार्मिक स्थळांच्या परिसरात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. एकूणच निवडणुकीतील विजयाचा आनंद आणि नवसपूर्तीची भक्ती यांचा संगम नवी मुंबईत पाहायला मिळत आहे.

