अपक्षांपेक्षा ‘नोटा‌’च सरस

अपक्षांपेक्षा ‘नोटा‌’च सरस

Published on

बेलापूर, ता. १९ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा राजकीय समीकरणांइतकेच ‌‘नोटा‌’ या पर्यायाने सगळ्यांचे लक्ष वेधले. २८ प्रभागांतील १११ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत नऊ लाख ४८ हजार ४६० मतदारसंख्या होती. २०१५मध्ये ४८ टक्के मतदान झाले असताना २०२६च्या बहुसदस्यीय पॅनेल निवडणुकीत तब्बल ५७.१५ टक्के मतदान झाले. मात्र मतदानात अपक्ष उमेदवारांपेक्षा ‌‘नोटा‌’ला सर्वाधिक मतदान झाल्याचे चिंताजनक चित्र दिसून आले. सर्व अपक्षांना निकालाअंती एकूण ५२ हजार ८६५ मते मिळाली, तर तब्बल ७१ हजार ५३० मते नोटाला मिळाल्याने राजकीय पक्षांसाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.

महापालिका निवडणुकीत प्रमुख पक्षांमध्ये तीव्र लढत दिसून आली. अनेक प्रभागांत विद्यमान नगरसेवक, नातेवाइकांतील राजकीय संघर्ष, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांची चुरस पाहायला मिळाली. निकाल हाती आले आणि भाजप अग्रस्थानी राहत शिवसेनेने नवी मुंबईतील दुसरा पक्ष म्हणून स्थान पटकावले. याचवेळी दुसरीकडे बहुतांश नागरिकांनी पॅनेल पद्धतीतील गोंधळ, नावडता उमेदवार यामुळे असंतोषाचा नोटा पर्याय निवडल्याचे दिसून आले. परिणामी वाढती नोटा पर्यायाची पसंती भविष्यातील मोठी धोक्याची घंटा मानली जात असून, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी पुढच्या पाच वर्षांत चांगली कामे करून नागरिकांची मने जिंकण्याचे आवाहन त्यांच्यासमोर असणार आहे.

नोटा, अपक्ष उमेदवारांमुळे विजयी घोडदौड थांबली
लोकशाही व्यवस्थेत ‌‘नोटा‌’ हा पर्याय केवळ एक तांत्रिक सुविधा नसून, मतदारांच्या असंतोषाचा थेट आवाज मानला जातो. नवी मुंबईसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला न पसंत करता ‌‘नोटा‌’ची निवड करणे चिंताजनक ठरत आहे. दरम्यान, झालेल्या निवडणुकीत अनेक उमेदवारांची विजयी घोडदौड थांबवण्याचे काम नोटा आणि अपक्ष उमेदवारांनी केल्याने मोठे नुकसान झाले.

प्रभाग २५मध्ये सर्वाधिक नोटा
प्रभाग क्रमांक २५ मधील क वर्गात भाजपच्या नेत्रा शिर्के यांनी आठ हजार ६३१ मते घेत बहुमताने विजय मिळवला. पराभूत उमेदवार शिवसेनेच्या सुजाता गुरव यांना चार हजार ७२८ मते मिळाली. परंतु याच वर्गात तब्बल दोन हजार ३९८ मते ‘नोटा‌’ला मिळाल्याचे दिसून आले.

मतदानावर नजर
एकूण अपक्ष उमेदवार - ८३
अपक्षांना झालेले मतदान - ५२,८६५
‘नोटा‌’ला एकूण मतदान - ७१,५३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com