मतपेटीतून उमटली बहुसांस्कृतिक ओळख
उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : उल्हासनगरची ओळख केवळ लघु उद्योगनगरी म्हणून नाही, तर विविध भाषा, समाज आणि संस्कृती यांचे जिवंत प्रतिबिंब म्हणूनही आहे. याच वास्तवाचे स्पष्ट दर्शन महापालिका निवडणूक निकालातून घडले आहे. ७८ जागांच्या महापालिकेत मराठी, सिंधी, पंजाबी, हिंदी आणि बंगाली समाजातील लोकप्रतिनिधी निवडून येत उल्हासनगर शहराच्या बहुसांस्कृतिक ओळखीला मतपेटीतून मान्यता मिळाली आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणूक निकालांनी शहराच्या सामाजिक रचनेचे अचूक प्रतिबिंब महापालिका सभागृहात उमटवले आहे. ७८ जागांच्या महापालिकेत मराठी भाषिक ४३, सिंधी समाजाचे २६, पंजाबी समाजाचे ५, हिंदी भाषिक ३ आणि एक बंगाली लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. हा आकडा उल्हासनगरच्या बहुभाषिक व बहुसांस्कृतिक स्वरूपाला अधोरेखित करणारा ठरतो. महाराष्ट्रातील एकमेव अशी शहरे, जिथे सिंधी समाजाचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे, त्या उल्हासनगरमध्ये मराठी समाजाबरोबरच इतर भाषिक समाजांनीही राजकीय सहभागातून आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. ही निवडणूक केवळ पक्षीय लढत न राहता, सामाजिक समतोल आणि लोकशाही प्रतिनिधित्वाचा आरसा ठरली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा निकाल उल्हासनगरकरांच्या विभाजनापेक्षा सहभागाला, ओळखीपेक्षा कामगिरीला आणि समाजापेक्षा शहरहिताला प्राधान्य देणाऱ्या मानसिकतेचा स्पष्ट संकेत देतो. महापालिका सभागृहात दिसणारी ही सामाजिक विविधता आगामी काळात धोरणनिर्मिती, विकासकामे आणि नागरी प्रश्नांवर व्यापक दृष्टिकोन निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. एकूणच, यंदाची उल्हासनगर महापालिका केवळ सत्तासंघर्षापुरती मर्यादित न राहता, शहराच्या बहुसांस्कृतिक आत्म्याचा लोकशाही उत्सव ठरली आहे, जिथे प्रत्येक समाजाचा आवाज सभागृहात पोहोचलेला दिसतो. विविध भाषा, वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमी आणि सांस्कृतिक ओळखी घेऊन आलेले हे लोकप्रतिनिधी शहराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
समाजवैविध्याचे प्रतिबिंब
मराठी समाजाचे सर्वाधिक ४३ नगरसेवक निवडून येणे हे स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि प्रशासकीय नेतृत्वात त्यांची प्रभावी भूमिका दर्शवते. त्याचवेळी २६ सिंधी लोकप्रतिनिधींची उपस्थिती ही उल्हासनगरच्या ऐतिहासिक सामाजिक रचनेची साक्ष देणारी आहे. लघुउद्योग, व्यापारी संस्कृती आणि शहराच्या आर्थिक घडामोडींमध्ये सिंधी समाजाचे योगदान यामुळेच या प्रतिनिधित्वाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सिख समाजाचे ५ लोकप्रतिनिधी, हिंदी भाषिक ३ आणि बंगाली समाजातील १ लोकप्रतिनिधी यामुळे महापालिका सभागृह अधिक समावेशक आणि विविधतेने नटलेले झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

