सिकलसेल एनीमिया मुक्तीसाठी विशेष अभियान

सिकलसेल एनीमिया मुक्तीसाठी विशेष अभियान

Published on

सिकलसेल ॲनिमियामुक्तीसाठी विशेष मोहीम
चार लाख नागरिकांची तपासणी

पालघर, (ता. २०) : पालघरच्या सार्वजनिक आरोग्य विभागच्या वतीने १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष पंधरवडा राबविला जात आहे. या मोहिमेअंतर्गत घरोघरी सिकलसेल तपासणी, निदान, उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यासह साडेतीन ते चार लाख नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.
अभियानदरम्यान तपासणी केलेल्या नागरिकांना आजाराच्या निदानप्रमाणे लाल, पिवळे व सफेद रंगाचे विशेष कार्ड देण्यात येणार असून, सिकलसेलग्रस्त रुग्ण व त्यांचे वाहक यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले जात आहे. जिल्ह्यातील ९१२ गावांमध्ये व शहरी भागात एकाच वेळी अभियान राबविण्यात येत असून, या अभियानातील गृहभेटीदरम्यान ४० वर्षापर्यंतच्या नागरिकांची तपासणी विशेष किटच्या सहाय्याने केली जात आहे. जिल्ह्यातील आश्रमशाळा व जिल्हा परिषद शाळांपैकी ६० टक्के शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण झाली असून, उर्वरित विद्यार्थ्यांची तसेच बाधित रुग्ण व वाहक यांच्या कुटुंबीयांसह सुमारे चार लाख नागरिकांची या विशेष अभियानादरम्यान तपासणी केली जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी दिली आहे.

चौकट

पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीत सिकलसेलचे १२२४ रुग्ण असून, १३,०९६ नागरिक हे सिकलसेलचे वाहक (कॅरियर) आहेत. या आजाराच्या रुग्णाला लाल कार्ड, तर वाहकांना पिवळे कार्ड देण्यात आले असून, शासनाकडून त्याला आवश्यक औषधोपचार व समुपदेशन केले जात आहे. जिल्ह्यात यापूर्वी किमान साडेपाच लाख नागरिकांची सिकलसेल तपासणी यापूर्वी झालेली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com