२८ वर्षांपासून प्रलंबित देणी मिळण्याबाबत सकारात्मक
२८ वर्षांनंतर मिळणार न्याय?
रबर कंपनीच्या कामगारांची प्रलंबित देणींबाबत सकारात्मकतेचे संकेत
आ. संजय केळकर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : इंडियन रबर कंपनीतील कामगारांना गेल्या तब्बल २८ वर्षांपासून रखडलेल्या आर्थिक देणींबाबत अखेर दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीची जागा क्लस्टर योजनेअंतर्गत घेतली जात असल्यामुळे या कामगारांना सहानुभूतीच्या आधारे न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
ठाण्यात भाजपच्या खोपट येथील कार्यालयातील ‘जनसेवकाचा जनसंवाद’ उपक्रमात कामगारांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी इंडियन रबर कंपनीच्या कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. केळकर यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून या कामगारांची आर्थिक देणी प्रलंबित असून, या संदर्भात कामगार आयुक्तांसोबत बैठका घेऊन चर्चा करण्यात आली आहे. न्यायालयात दावा यशस्वी ठरला नसला, तरी मानवीय व सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून कामगारांना दिलासा मिळावा, यासाठी पर्यायी मार्गाने कार्यवाही सुरू आहे. विशेष म्हणजे कंपनीची जागा क्लस्टर योजनेसाठी घेण्यात आल्यामुळे ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनीही या कामगारांना न्याय मिळण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली असल्याचे केळकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ठाणे, बदलापूर, भिवंडी आदी परिसरांतील नागरिकांनी उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. नागरिकांकडून आर्थिक फसवणुकीसंदर्भातील तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्या. आर्थिक गुन्हे शाखेकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने अनेक प्रकरणे रखडली असून, या विभागाला अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहितीही केळकर यांनी दिली.
पदासाठी नव्हे, नागरिकांच्या हक्कांसाठी भूमिका
राजकीय भूमिकेबाबत बोलताना संजय केळकर म्हणाले की, भाजप व शिवसेना यांनी महायुती म्हणून निवडणूक लढवली असून, ही युती कायम राहील. मात्र सत्तेतील पदांसाठी संघर्ष केला जाणार नाही. पारदर्शक शहर विकास, नागरिकांच्या हिताच्या योजना आणि त्यांच्या मूलभूत गरजांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आवश्यक असल्यास सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची भूमिका घेतली जाईल.
केळकरांचे सूचक विधान
२०१७ मध्ये आम्ही विरोधी बाकांवर बसलो होतो; नागरिकांच्या हितासाठी गरज पडल्यास यावेळीही तीच भूमिका घ्यायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असेही केळकर यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

