आता थकबाकीदारांना थेट नोटिसा

आता थकबाकीदारांना थेट नोटिसा

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २० : शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना महापालिकेच्या लवकरच नोटिसा मिळणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर थकवणाऱ्या करदात्यांना आज (ता. २०)पासून नोटीस देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहेत. महापालिकेला तब्बल ६० हजार करधारकांकडून कर येणे बाकी आहे. याअनुषंगाने मालमत्ता कर विभागाने कारवाई सुरू केली असून लवकरच जप्तीची कारवाईदेखील केली जाणार आहे.

चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी महापालिकेने एक हजार २०० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. विशेष म्हणजे, या वर्षाच्या केवळ पहिल्या सात महिन्यांतच (एप्रिल ते ऑक्टोबर) पालिकेने ५०० कोटींचा टप्पा पार केला असून, यामध्ये ३१३ कोटींहून अधिक वाटा डिजिटल देयकांचा आहे. २०१९-२० आर्थिक वर्षामध्ये महापालिकेने अंदाजे ५५८ कोटींची मालमत्ता कर वसुली केली होती. पुढील दोन वर्षांत तो थोडा बदल झाला, पण २०२२-२३ मध्ये ६३३.१७ कोटी विक्रमी वसुली झाली होती. ही त्या वेळेच्या इतिहासातील उच्चतम विक्रम मानला गेला होता. त्यानंतर, २०२३-२४ मध्ये महापालिकेने पूर्वीच्यापेक्षा वाढ करून जवळपास ६६६ कोटीपैकी ४६५.७ कोटी पहिल्या नऊ महिन्यांतील वसुलीचा समावेश आहे.

‘लिडार’ सर्वेक्षणाचे महत्त्व आणि फायदे
- महापालिकेने राबवलेल्या ‘लिडार’ तंत्रज्ञानावर आधारित सर्वेक्षणामुळे मालमत्ता कराच्या संरचनेत मोठे बदल झाले आहेत. या सर्वेक्षणाचा पालिकेला विविध कारणांमुळे मोठा फायदा होत आहे.
- ३६० डिग्री पॅनोरामिक व्हिडिओ आणि जीआयएस मॅपिंगमुळे अशा मालमत्तांची ओळख पटली आहे, ज्या यापूर्वी महापालिकेच्या रेकॉर्डवर नव्हत्या किंवा कराच्या जाळ्यातून सुटल्या होत्या.
- अनेक रहिवाशांनी विशेषतः सिडकोनिर्मित घरांमध्ये (उदा. नेरूळ, वाशी, ऐरोली) अंतर्गत बदल करून अतिरिक्त मजले चढवले आहेत किंवा निवासी जागांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी सुरू केला आहे. लिडार तंत्रज्ञानामुळे अशा ७५ हजारांहून अधिक नवीन मालमत्ता किंवा वाढीव बांधकामे समोर आली आहेत.
- कोणावरही अन्याय न होता, प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या जागेनुसार कर आकारणी करणे शक्य झाले आहे. कराचे दर न वाढवता केवळ अचूक नोंदींमुळे महापालिकेच्या उत्पन्नात तीन ते चारपट वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम
२०२४-२५ मध्ये पहिल्यांदाच करवसुलीचा ८०० कोटींचा विक्रम मोडला गेला. या वषामध्ये आतापर्यंत ८२६.१ कोटी महापालिकेच्या तिजोरीमध्ये जमा झाला आहे. हा आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम ठरला आहे.

‘स्कॉच पुरस्कार’ने सन्मान
नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता कर वसुलीच्या क्षेत्रात नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. डिजिटल प्रशासन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शहराच्या तिजोरीत विक्रमी महसूल जमा झाला आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या १०४ व्या स्कॉच शिखर परिषदेत पालिकेला मालमत्ता कर व्यवस्थेतील आमुलाग्र सुधारणांसाठी महापालिकेला मानाचा ‘स्कॉच पुरस्कार २०२५’ देऊन गौरवण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिकेमध्ये आतापर्यंत एक लाख १२ हजार मालमत्ताधारकरांनी कर जमा केला आहे. उर्वरित ६० हजार लोकांनी कर गोळा केलेला नाही. अशांपैकी सर्वाधिक जास्त थकबाकी असणाऱ्या १०० मालमत्ताधारकांना नोटीस देऊन जप्तीची कारवाई करणार आहोत.
- डॉ. अमोल पालवे, उपायुक्त (मालमत्ता कर विभाग), नवी मुंबई महापालिका

गेल्या काही वर्षांतील करवसुली (कोटींमध्ये)
२०१९-२० ५५८
२०२०-२१ ५३४
२०२१-२२ ५२६
२०२२-२३ ६०६
२०२३-२४ ६६६
२०२४-२५ ८२६.१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com