उल्हासनगर निवडणुकीत मतांचे निकालयुद्धे

उल्हासनगर निवडणुकीत मतांचे निकालयुद्धे

Published on

उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : लोकशाहीच्या रणांगणात यंदा उल्हासनगरने इतिहास रचला. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत मतदारांनी जुने राजकीय गणिते उलथवून टाकत ‘काम, जनसंपर्क आणि विश्वास’ यांनाच कौल दिला. कुठे विक्रमी मताधिक्य, कुठे अवघ्या काही मतांनी विजय, तर अनेक दिग्गजांना धूळ चारत नव्या चेहऱ्यांनी सत्तासमीकरणच बदलून टाकले. या निकालांनी शहराच्या राजकारणाची ‘दिशा आणि दशा’ दोन्ही बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणूक निकाल शहराच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणणारे ठरले आहेत. अनेक प्रभागांमध्ये अटीतटींची लढत झाली, तर काही ठिकाणी मतदारांनी एकतर्फी कौल देत आपली भूमिका स्पष्ट केली. या निकालांनी हे अधोरेखित केले की, यंदा जात-पात किंवा पक्षनिष्ठेपेक्षा उमेदवारांचे काम, जनसंपर्क आणि विश्वासार्हता अधिक महत्त्वाची ठरली. निवडणुकीतील सर्वांत मोठा विक्रम प्रेरणा माखीजानी यांनी प्रस्थापित केला. त्यांनी तब्बल ७,८४० मते मिळवत संपूर्ण पालिका निवडणुकीतील सर्वाधिक मते मिळविण्याचा मान पटकावला. त्यांच्या निकटवर्तीय प्रतिस्पर्धी आयशा वधरिया यांना ५,४८७ मते मिळाली, तर २,३५३ मतांच्या फरकाने प्रेरणा माखीजानी यांनी दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले.
दुसरीकडे, काही प्रभागांतील निकाल शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून ठेवणारे ठरले. पॅनल क्रमांक चारमध्ये भाजपच्या शोभा जाधव यांनी ३,११५ मते मिळवत शिंदे गटाच्या रूपाली म्हस्के यांचा अवघ्या १६ मतांच्या अत्यंत अल्प फरकाने पराभव केला. हा विजय जितका नाट्यमय, तितकाच तो संपूर्ण निवडणुकीतील सर्वात कमी मताधिक्याने मिळालेला विजय ठरला. याच्या अगदी उलट चित्र पॅनल क्रमांक १३ मध्ये पाहायला मिळाले. शिंदे गटाचे प्रदीप गोडसे यांनी ६,३५४ मते मिळवत आपली ताकद दाखवून दिली. त्यांच्या प्रतिस्पर्धी सुषमा घाग यांना केवळ १,६५३ मते मिळाल्याने ४,७०१ मतांच्या प्रचंड फरकाने प्रदीप गोडसे यांनी विजय मिळवला. हा विजय संपूर्ण निवडणुकीतील सर्वात मोठ्या मताधिक्याचा ठरला. एकूणच, उल्हासनगर महापालिका निवडणूक ही केवळ जागांची लढत न राहता, ती जनतेच्या बदलाच्या इच्छेची साक्ष ठरली आहे.

माजी नगरसेवकांचा पराभव
निवडणुकीचा सर्वांत मोठा राजकीय संदेश म्हणजे सत्ताधारी आणि माजी नगरसेवकांना बसलेला जोरदार धक्का मानला जात आहे. एकूण ७८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तब्बल ४१ विद्यमान माजी नगरसेवकांचा पराभव झाला. यावरून मतदारांनी ‘सत्ता नव्हे, तर काम हवे’ असा स्पष्ट आणि कठोर संदेश दिल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com