निवडणुकीनंतर रमाबाई नगरात जनआंदोलनाची तयारी
निवडणुकीनंतर रमाबाई नगरात जनआंदोलनाची तयारी
५०० चौ. फुटांच्या घरांच्या मागणीवर रहिवासी ठाम
घाटकोपर, ता. २० (बातमीदार) : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडली. या निवडणुकीत घाटकोपर पूर्वेकडील प्रभाग क्रमांक १३३ मधून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुप्रिया जाधव/जगताप यांना ८,६५६ मते मिळाली. या भागात प्रथमच आंबेडकरी चळवळीतील उमेदवाराला इतकी मोठी मते मिळाल्याने सोमवारी माता रमाबाई आंबेडकर नगरात ‘आभार मेळावा’ आयोजित करण्यात आला.
या मेळाव्यात यापुढे आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन संघटितपणे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या परिसरात सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत धारावीच्या धर्तीवर रहिवाशांना ५०० चौ. फुटांची घरे देण्यात यावीत, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. या मागणीसाठी जनआंदोलन उभारण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगरातील रहिवाशांना ५०० चौ. फुटांची घरे मिळावीत यासाठी लवकरच व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असे या वेळी उपस्थित अनेक कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत आंबेडकरी चळवळीतील व आंबेडकरी विचारांच्या मतदारांनी अभूतपूर्व मतदान केल्याचा उल्लेख वक्त्यांनी केला. भविष्यात सर्व आंबेडकरी पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.
या आभार मेळाव्याला नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या उल्लेखनीय मतांमुळे या भागातील आंबेडकरी चळवळीची ताकद स्पष्ट झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे येथील घरांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभारावे, अशी मागणी करण्यात आली.
झोपडीधारकांच्या फसवणुकीचा आरोप
माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथे सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झोपडीधारकांची फसवणूक होत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. काही स्थानिक व्यक्तींना हाताशी धरून रहिवाशांवर अन्याय केला जात असल्याचे सांगत या प्रकल्पात पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.
जनजागृती अभियान राबवणार!
मराठी माणसाला घाटकोपरमधून हद्दपार करण्याचे शिस्तबद्ध नियोजन सुरू आहे. हे डाव रोखण्यासाठी मानवी साखळीच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवले जात आहे. रमाबाई नगरात लवकरच जनआंदोलन उभे राहील, अशी प्रतिक्रिया कामगार नेते रमेश जाधव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

