हुतात्मा राजगुरू उड्डाणपुलावर ‘क्लीन-अप’ वाहनांचा तळ
हुतात्मा राजगुरू उड्डाणपुलावर ‘क्लीन-अप’ वाहनांचा तळ
अंधारात अपघाताची दाट शक्यता; वाहतूक विभागाचे दुर्लक्ष
कांदिवली, ता. २१ (बातमीदार) : कांदिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या हुतात्मा राजगुरू उड्डाणपुलावर गेल्या कित्येक महिन्यांपासून घनकचरा व्यवस्थापन विभागाची ‘क्लीन-अप’ वाहने सर्रास उभी केली जात आहेत. पहाटे व रात्रीच्या वेळी ही वाहने सहजपणे दिसून न आल्याने गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या धोकादायक पार्किंग झोनकडे वाहतूक विभाग व महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
हुतात्मा राजगुरू उड्डाणपुलावर सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. उड्डाणपुलाखाली घनकचरा व्यवस्थापनाची चौकी असून, संबंधित विभागाची वाहने थेट पुलावर उभी केली जातात. या वाहनांच्या पुढील बाजूस भगवा तर मागील बाजूस हिरवा रंग असतो; मात्र कचरा वाहतुकीमुळे हिरव्या रंगाची वाहने काळपट झाली आहेत.
सध्या हिवाळ्यामुळे रात्रीचा कालावधी वाढला असून दिवस उशिरा उजाडतो. तसेच अदाणी इलेक्ट्रिसिटी व्यवस्थापनाकडून पहाटे उजाडण्यापूर्वी पथदिवे बंद केले जात असल्याने पुलावर काळोख असतो. अशा परिस्थितीत उड्डाणपुलावर उभी असलेली ‘क्लीन-अप’ वाहने वाहनचालकांना दिसत नाहीत. समोरून येणाऱ्या वाहनांच्या दिव्यांमुळे क्षणभर काहीही न दिसल्याने अचानक समोर उभ्या असलेल्या वाहनांमुळे चालक गोंधळून जातात.
विशेषतः रात्री व पहाटे पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची मोठी फसगत होत असून, रांगेत उभी केलेली चार-पाच वाहने अचानक समोर आल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. वारंवार तक्रारी करूनही केवळ तात्पुरती कारवाई होत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे. नवीन वर्षात तरी या वाहनांवर कठोर कारवाई करून उड्डाणपुल मार्ग अपघातमुक्त करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
तातडीने वाहने हटवणार!
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कनिष्ठ अधिकारी मोहिते यांनी सांगितले, की सर्व वाहनचालकांना वाहने चेकपोस्टवर आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी ताकीद देऊन नोटिसाही बजावण्यात आली आहेत. संबंधित सुपरवायझरशी बोलून उड्डाणपुलावरील वाहने तातडीने हटवण्यात येतील.
आम्ही उड्डाणपुलाच्या अगदी शेजारी राहतो. दिवसभर ‘क्लीन-अप’ वाहने उलट्या दिशेने येतात व पुलावरच उभी केली जातात. मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? महापालिका व वाहतूक पोलिसांची ही डोळेझाक दुर्दैवी आहे.
- विजय बडगे, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

