निवडणुका संपताच महिलांच्या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष
वाशी, ता. २१ (बातमीदार) : नवी मुंबई शहरात मकर संक्रांतीचा सण म्हणजे केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव न राहता गेल्या काही वर्षांत तो राजकीय हालचालींचे केंद्र बनला आहे. विशेषतः महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेते महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी हळदी-कुंकू समारंभांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करत असत. आकर्षक वाण, भेटवस्तू, मनोरंजनाचे कार्यक्रम, महिला मेळावे, आरोग्य तपासणी शिबिरे, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जात असे, मात्र निवडणुका पार पडताच महिलांच्या कार्यक्रमांकडे नेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
२०२० मध्ये नवी मुंबई महापालिकेची निवडणूक अपेक्षित होती, मात्र कोरोनामुळे राज्यातील सत्तासंघर्ष, न्यायालयीन प्रक्रिया आणि प्रशासकीय अडचणींमुळे या निवडणुका दीर्घकाळ लांबणीवर पडल्या. या कालावधीत अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीसाठी महिला मतदारांशी संपर्क वाढवला होता आणि संक्रांतीसारख्या सणांचा पुरेपूर राजकीय वापर केला होता. आता पालिका निवडणुका पार पडल्यावर पुढील पाच वर्षे निवडणूक प्रक्रिया नाही. याचा थेट परिणाम यंदाच्या मकर संक्रांतीवर झाल्याचे दिसून येत आहे. संक्रांत सुरू होऊन सहा दिवस उलटून गेले तरी नवी मुंबई शहरातील कोणत्याही प्रभागात राजकीय नेते, पक्ष संघटना किंवा नगरसेवकांच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू किंवा विशेष कार्यक्रमांचे आयोजन झाल्याचे चित्र नाही.
निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार स्वाभाविकपणे अशा कार्यक्रमांपासून दूर राहिले आहेत, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे निवडून आलेले नगरसेवकही यंदा हळदी-कुंकू किंवा महिला मेळाव्यांकडे पाठ फिरवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दरवर्षी संक्रांतीच्या काळात दिसणारी राजकीय गजबज, महिला सहभाग आणि उत्साह यंदा पूर्णपणे गायब आहे. या परिस्थितीमुळे अनेक महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सामाजिक बांधिलकीसाठी उपक्रम हवेत!
निवडणुकीवेळी महिलांसाठी कार्यक्रम, भेटवस्तू आणि आश्वासने दिली जातात. मात्र, निवडणूक संपताच दुर्लक्ष केले जाते, अशी भावना अनेक महिलांकडून व्यक्त होत आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही यावर नाराजी व्यक्त करत, सण-उत्सव हे केवळ मतांसाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून साजरे व्हायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
राजकीय लाभापुरतेच उपक्रम
नवी मुंबई हे सुशिक्षित आणि प्रगत शहर मानले जाते, तर दुसरीकडे महिलांच्या सहभागासाठी असलेले पारंपरिक आणि सामाजिक उपक्रम राजकीय स्वार्थापुरतेच मर्यादित राहिल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. यंदाच्या संक्रांतीत राजकीय हळदी-कुंकू समारंभांना पूर्णविराम मिळाल्याने, पुढील काळात तरी निवडून आलेले प्रतिनिधी महिलांसाठी सामाजिक उपक्रम राबवणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

