निवडणूक कामाचा ठाणे परिवहन सेवेवर फटका

निवडणूक कामाचा ठाणे परिवहन सेवेवर फटका

Published on

निवडणूक कामाचा ठाणे परिवहन सेवेला फटका
दोन दिवसांत सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान; प्रवाशांची मोठी गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेचा फटका ठाणे परिवहन सेवेला बसला असून, अवघ्या दोन दिवसांत सुमारे २५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक कामासाठी मोठ्या प्रमाणावर बस वापरण्यात आल्याने सर्वसामान्य ठाणेकर प्रवाशांचीही मोठी गैरसोय झाली.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. या कामासाठी तब्बल १२ हजारांहून अधिक निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना शहरातील दोन हजार १३ मतदान केंद्रांवर ने-आण करण्यासाठी ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यातील २७५ बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. १४ जानेवारीला सकाळी या बसद्वारे कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर सोडण्यात आले, तर १५ जानेवारीला रात्री ठाणे रेल्वेस्थानक व शहरातील विविध ठिकाणी परत आणण्यात आले. परिणामी, या दोन दिवसांत सामान्य प्रवाशांसाठी केवळ ११० बसच उपलब्ध होत्या. त्यामुळे विशेषतः १४ जानेवारीला सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अपुरी बससेवा असल्याने अनेक प्रवाशांना रिक्षा व खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.
................................
परिवहनची आकडेवारी
ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून दररोज सरासरी तीन लाख १० हजार प्रवासी प्रवास करतात आणि साधारण २७ ते २८ लाख रुपये उत्पन्न मिळते. मात्र १४ जानेवारीला उत्पन्न घटून १८ लाख १२ हजार ५८९ रुपये इतके नोंदवले गेले. मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आल्याने आणि बस कमी उपलब्ध असल्यामुळे १५ जानेवारीला उत्पन्न आणखी घसरून १४ लाख ५६ हजार १७३ रुपये इतकेच राहिले. १६ जानेवारीपासून बससेवा पूर्ववत झाल्यानंतर उत्पन्नात वाढ झाली. त्या दिवशी २६ लाख २१ हजार ९१ रुपये, तर १७ जानेवारीला २७ लाख तीन हजार ५४३ रुपये उत्पन्न मिळाले. या आकडेवारीच्या तुलनेत निवडणूक काळात ठाणे परिवहन सेवेचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
...............
चौकट :
प्रवाशांच्या अडचणी वाढल्या
सकाळी व सायंकाळी बससाठी मोठ्या रांगा
वेळेत कार्यालये व शाळांमध्ये पोहोचण्यात अडथळे
रिक्षा व खासगी वाहनांवर अतिरिक्त खर्च
ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची विशेष गैरसोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com