पश्चिम रेल्वेच्या लोकलवर मराठीऐवजी हिंदी ‘रेलवे’
पश्चिम रेल्वेच्या लोकलवर मराठीऐवजी हिंदी ‘रेलवे’
- प्रवाशांत संताप
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : जगातील सर्वात व्यस्त रेल्वे नेटवर्क आणि मुंबईची ‘लाइफलाइन’ म्हणून ओळखली जाणारी पश्चिम रेल्वे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ज्या रेल्वेने दररोज लाखो मुंबईकर प्रवास करतात त्या रेल्वे प्रशासनाला स्वतःचे नाव मराठीत शुद्धपणे लिहिता येत नाही का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मुंबईकरांनी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये पश्चिम रेल्वेच्या एका लोकल डब्यावर मराठीत अपेक्षित असलेला ‘रेल्वे’ हा शब्द न वापरता हिंदीतील ‘रेलवे’ असा उल्लेख करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येते. मराठी ही राज्याची अधिकृत भाषा असताना आणि देवनागरी लिपीचा वापर बंधनकारक असताना, थेट हिंदी शब्द वापरण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.
ही चूक केवळ पेंटिंग करणाऱ्या कामगारापुरती मर्यादित नसून, संबंधित कामाची तपासणी आणि मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाकडेही बोट दाखवणारी आहे. इतक्या मोठ्या अक्षरांत लिहिलेले नाव कोणाच्याच नजरेस न पडणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
मराठीचा दुजाभाव?
मुंबई महापालिका हद्दीत दुकानांच्या पाट्यांवर मराठी भाषा वापरणे सक्तीचे असताना, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वे प्रशासनाकडूनच मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. नियम सामान्यांसाठी असतील तर सरकारी यंत्रणांनाही तेच नियम लागू झाले पाहिजेत, अशी भावना अनेक मुंबईकर व्यक्त करीत आहेत.
मराठीत ‘रेल्वे’ लिहिणे अपेक्षित असताना हिंदीतील ‘रेलवे’ वापरणे ही गंभीर बाब आहे. अधिकारी वर्गाने ही चूक वेळेत ओळखली नाही, यावरून त्यांच्या कामात किती हलगर्जी आहे ते दिसते. ही चूक केवळ शब्दांची नाही, तर प्रशासनातील बेसावधपणाची आहे. तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
- लता अरगडे,
अध्यक्षा,
उपनगरीय प्रवासी महासंघ
पश्चिम रेल्वेसारख्या मोठ्या संस्थेने मराठी भाषेचा सन्मान राखणे अपेक्षित आहे. ‘रेल्वे’ऐवजी हिंदीतील ‘रेलवे’ वापरणे हे चुकीचे आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दुरुस्ती करावी.
- नंदकुमार देशमुख,
प्रवासी संघटना नेते
रेल्वे, पोस्ट आणि इतर केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये दोन्ही भाषांसाठी वापरली जाणारी लिपी जवळपास सारखी असल्याचा फायदा घेऊन हिंदी भाषेची सक्ती हळूहळू केली जात आहे. त्यामुळे मराठीऐवजी हिंदीचाच वापर वाढत असून, ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. विशेषतः रेल्वे, पोस्ट आणि बँका या तीन ठिकाणी मराठी भाषेला जाणीवपूर्वक बाजूला सारले जात आहे. ज्या ठिकाणी मराठी लोकांच्या संघटना आणि युनियन्स कार्यरत आहेत, त्यांनी या मुद्द्यावर ठामपणे आवाज उठवला पाहिजे. या प्रकाराचा सातत्याने पाठपुरावा होणे गरजेचे आहे.
- दीपक पवार, अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

