भिवंडीत ‘नोटा’चा अधिकार

भिवंडीत ‘नोटा’चा अधिकार

Published on

भिवंडी, ता. २१ (वार्ताहर) : भिवंडी महापालिका निवडणुकीत यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असली, तरी २५ हजार ७६९ मतदारांनी ‘नोटा’चा वापर करत थेट सर्वच उमेदवारांना नकार दिला, ही बाब राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत असतानाच मोठ्या संख्येने मतदारांनी कोणत्याही पक्षावर अथवा उमेदवारावर विश्वास न दाखवणे, हा सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांसाठी इशारा देणारा कौल मानला जात आहे.
भिवंडी पालिका निवडणुकीसाठी एकूण सहा लाख ६८ हजार ३३ मतदार पात्र होते. यामध्ये तीन लाख ८० हजार ६२३ पुरुष, दोन लाख ८८ हजार ९७ महिला तर ३१३ इतर मतदारांचा समावेश होता. निवडणुकीत मतदान करणाऱ्यांमध्ये एक लाख ९५ हजार ६०० पुरुष, एक लाख ६१ हजार ८४० महिला, तर ४५ इतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. स्त्रियांच्या तुलनेत पुरुष मतदारांची संख्या अधिक असल्याचे चित्र यावेळीही कायम राहिले. २०१२ मधील ४९ टक्के आणि २०१७ मधील ५१ टक्क्यांच्या तुलनेत ही टक्केवारी वाढलेली असली, तरी मतदानाचा उत्साह वाढूनही राजकीय समाधान मात्र कमी असल्याचे ‘नोटा’ने स्पष्ट केले आहे.

‘नोटा’ वाढण्यामागे काय कारण?
राजकीय विश्लेषकांच्या मते, नोटा मतदानामागे अनेक कारणे दडलेली आहेत. एकाच कुटुंबातील अनेक उमेदवार, जुनेच चेहरे, स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका न घेणारे नगरसेवक, तसेच विकासाऐवजी वैयक्तिक व पक्षीय राजकारण यामुळे मतदारांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. उमेदवार निवडणे भाग होते, मात्र विश्वास ठेवण्यासारखा पर्याय नाही, ही भावना नोटा मतदानातून व्यक्त झाल्याचे चित्र आहे.

कौटुंबिक राजकारणावर प्रश्नचिन्ह
भिवंडी पालिका निवडणुकीत काही प्रभागांमध्ये कौटुंबिक राजकारणाचा प्रभाव प्रकर्षाने दिसून आला. निवडणुकीत दोन दाम्पत्ये, एक पितापुत्र जोडी; तसेच सख्ख्या भावांची जोडी विजयी झाल्याने कौटुंबिक राजकारणाचा प्रभाव पुन्हा अधोरेखित झाला आहे. हीच बाब अनेक मतदारांना खटकत असल्याचेही दिसून येते. “नगरसेवक पद हे सेवा करण्यासाठी आहे की वारसा हक्काने मिळणारे स्थान?” असा प्रश्न सामान्य मतदार उपस्थित करताना दिसत आहे. माजी महापौर विलास पाटील-प्रतिभा पाटील; तसेच माजी उपमहापौर मनोज काटेकर-वंदना काटेकर अशी दोन दाम्पत्ये निवडणुकीत विजयी झाली आहेत. याशिवाय, भादवड-टेमघर भागातून ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी आणि त्यांचे पुत्र रोहित चौधरी यांनी विजय मिळवला. तर पद्मानगर परिसरातील लगतच्या दोन प्रभागांतून भाजपचे संतोष शेट्टी आणि त्यांचे सख्खे बंधू राजेश शेट्टी यांनी यश मिळवले आहे.

९० पैकी ४८ नगरसेवक अल्पसंख्याक
निवडून आलेल्या एकूण ९० नगरसेवकांपैकी ४८ नगरसेवक अल्पसंख्याक समाजातील आहेत. तसेच २७ नगरसेवक हे भूमिपुत्र आगरी समाजाचे असल्याने नव्या पालिकेत सामाजिक प्रतिनिधित्वाचा समतोल साधला गेल्याचे चित्र दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com