शेकापसमोर गड राखण्याचे आव्हान
पनवेल, ता. २१ (बातमीदार) : रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मंगळवारी (ता. ५) मतदान होणार आहे. पनवेल तालुक्यात एकूण ३४६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. आज (ता. २१) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पनवेलमधून जिल्हा परिषदेच्या आठ गटासाठी ४१ आणि पंचायत समितीच्या १६ गणांसाठी ८३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेतील आठपैकी चार सदस्यांनी पक्षांतर केले आहे. पूर्वीचे दोन भाजप सदस्य धरून एकूण सहा सदस्य सध्या भाजपकडे असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीची पनवेल तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षासमोर गड राखण्याचे आव्हान आहे.
सध्याच्या राजकीय चित्राचा विचार करता, रायगड जिल्हा परिषदेत आठ गटांपैकी भाजपकडे दोन, तर शेतकरी कामगार पक्षाकडे सहा गटांची सत्ता आहे. पनवेल पंचायत समितीच्या १६ गणांमध्ये भाजप सहा, काँग्रेस तीन आणि शेतकरी कामगार पक्ष सात गणांवर सत्ताधारी आहे. शेतकरी कामगार पक्षाने वांवजे, पळस्पे, वावेघर, कर्नाळा, पाली देवद या भागांत पक्षाची मजबूत पकड असल्याचा दावा केला असून, या ठिकाणांहून जिल्हा परिषदेचे पाच व पंचायत समितीचे दहा उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र गव्हाण व वडघर या भागांत पक्षांतराचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपचे निवडून आलेले उमेदवार रेश्मा शेळके यांचे पती शेखर शेळके यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला आहे, परंतु पळस्पा, वावेघर, कर्नाळा व वडघर येथील जिल्हा परिषदेचे चार विद्यमान सदस्यांनी पक्षांतर केल्याने त्याचा भाजपला फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये महाविकास आघाडी आपला गड शाबूत ठेवते की, भाजपची लाट रायगड जिल्हा परिषदेत कमळ फुलवते, हे मतदान व मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. एकूणच ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. मतदानाची टक्केवारी व मतदारांचा प्रतिसाद निकालावर निर्णायक ठरेल, असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आम्ही ताकदीने लढवणार आहोत. पनवेल महापालिकेप्रमाणे पंचायत समितीतही दहापेक्षा जास्त सदस्य निवडून भाजपची सत्ता येईल.
- प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल
मागील निवडणुकीत पक्षीय बलाबल (शेकाप सत्तेत )
रायगड जिल्हा परिषद (आठ गट)
भाजप २
शेकाप ६
पनवेल पंचायत समिती (१६ गण)
भाजप ६
काँग्रेस ३
शेकाप ७
पनवेल तालुक्यातील मतदान
जिल्हा परिषद गट ८
पंचायत समितीचे गण १६
एकूण मतदार २,७९,७७६
महिला १,३६,०३२
पुरुष १,४३,७२४
तृतीयपंथी २०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

