केडीएमसीत शिंदे गटाची सत्तासमीकरणे मजबूत

केडीएमसीत शिंदे गटाची सत्तासमीकरणे मजबूत

Published on

सत्ता समीकरणात शिंदे गटाचे पारडे जड
कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या पाठिंब्याने राजकीय डावपेच बदलला
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी शिवसेना शिंदे गटाने खेळलेला राजकीय डाव अखेर यशस्वी ठरताना दिसत आहे. कोकण भवन येथे बुधवारी शिंदे गटाच्या ५३ नगरसेवकांनी अधिकृत गट स्थापन केला. त्याचवेळी मनसेच्या पाच नगरसेवकांनीही स्वतंत्र गट स्थापन करीत थेट शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे महापालिकेतील सत्ता समीकरणात शिंदे गटाचे पारडे अधिक जड झाले आहे.
या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसेचे नेते राजू पाटील उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मनसेच्या पाठिंब्याची अधिकृत घोषणा करीत महायुतीचीच सत्ता केडीएमसीत स्थापन होणार असल्याचा दावा केला आहे. तर मनसेचे नेते राजू पाटील यांनी प्रसिद्धिमाध्यमांना सांगितले, की आम्ही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. महापालिकेमध्ये इतके दिवस सत्तास्थापनेसाठी आकडेवारीचा खेळ सुरू होता. ही परिस्थिती आम्हाला थांबताना दिसत नव्हती. परिस्थिती कुठेतरी स्थिर व्हावी म्हणून हा पाठिंबा दिला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे युतीत लढले असून, दोघांना आमचा पाठिंबा आहे. सत्तेत असताना विकासकामे होतात, त्या अनुषंगाने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.

विरोधकांची गणिते बिघडली
राजकीयदृष्ट्या पाहता ही केवळ विकासासाठीची युती नसून, महापालिकेतील नेतृत्वावर पकड मजबूत करण्यासाठीचा शिंदे गटाचा रणनीतीपूर्ण निर्णय मानला जात आहे. निवडणुकीत मनसेने शिंदे गटाविरोधात भूमिका घेतली असतानाही निकालानंतर त्यांना जवळ करून घेण्यात शिंदे गट यशस्वी ठरला आहे. यामुळे विरोधकांची गणिते बिघडली असून ठाकरे गटासाठी ही मोठी राजकीय धोक्याची घंटा मानली जात आहे.

उपयुक्तता अधोरेखित
मनसेचा पाठिंबा मिळाल्याने शिंदे गटाला केवळ संख्याबळच नाही, तर विरोधी आघाडी फोडण्याचा संदेशही देता आला. एका बाजूला भाजप आधीच महायुतीचा मजबूत आधारस्तंभ आहे. दुसऱ्या बाजूला मनसेलाही सोबत घेत शिंदे गटाने स्वतःची उपयुक्तता अधिक ठळकपणे अधोरेखित केली आहे.

शिंदे गटासाठी ‘बोनस पॉइंट्स’
मनसेबरोबर युतीबाबत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना ‘विकासासाठी एकत्र येणे’ असा शब्दप्रयोग केला असला, तरी राजकीय वर्तुळात हा निर्णय सत्तेची चावी आपल्या हातात ठेवण्यासाठी उचललेले पाऊल म्हणून पाहिला जात आहे. विशेषतः ठाकरे गटाला एकाकी पाडण्याच्या रणनीतीचा हा भाग असल्याचे जाणकार सांगतात. राजू पाटील यांच्याशी असलेली मैत्री आणि मनसेच्या नगरसेवकांचा पाठिंबा हे शिंदे गटासाठी ‘बोनस पॉइंट्स’ ठरत आहेत. त्यामुळे महापालिकेत सत्ता स्थापन करताना शिंदे गट आता केवळ भाजपावर अवलंबून नसून, स्वतंत्र राजकीय वजन दाखवण्याच्या स्थितीत आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com