नवी मुंबईत काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात

नवी मुंबईत काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात

Published on

नवी मुंबईत काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात
अंतर्गत वाद, स्वार्थी राजकारणाचा फटका

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ : नवी मुंबई महापालिकेत एकेकाळी उपमहापौर, विरोधी पक्षनेते आणि दहा नगरसेवकांची ताकद असलेल्या काँग्रेसला यंदाच्या महापालिका निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला आहे. अंतर्गत हेवेदावे, स्वार्थी नेतृत्व आणि नियोजनशून्य कारभारामुळे काँग्रेसचे नवी मुंबईतील राजकीय अस्तित्व अक्षरशः संपुष्टात आल्याची चर्चा आता उघडपणे होत आहे. विशेष म्हणजे, या पराभवाचे खापर जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी यांनी थेट उबाठा गटावर फोडल्याने काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता आणखी चिघळली आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी २५ जणांनी अर्ज करून मुलाखती दिल्या होत्या; मात्र महाविकास आघाडीबाबत कोणतीही कार्यकारिणी बैठक न घेता, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मत न विचारता निर्णय घेण्यात आले. महाविकास आघाडीच्या चर्चांमध्ये फक्त प्रभारी मोनिका जगताप, जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी आणि माजी नगरसेवक संतोष शेट्टी हेच सहभागी होते. कोणत्या जागा मागायच्या, कोणत्या सोडायच्या, याबाबत कार्यकर्त्यांना विश्वासातच घेतले गेले नाही.
स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या जागा सुरक्षित ठेवण्यापुरतेच राजकारण केल्याने काँग्रेसच्या संभाव्य जिंकणाऱ्या उमेदवारांचा हिरमोड झाला. नेरूळ, वाशी आणि कोपरखैरणे येथील पारंपरिक काँग्रेसच्या जागांवर उबाठा गटाने दावा केल्यानंतरही काँग्रेस नेतृत्व तो परतवू शकले नाही. परिणामी, काँग्रेसच्या वाट्याला केवळ आठ जागा राहिल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) २५ जागांवर पोहोचली.
अखेर उमेदवारी अर्जाच्या टप्प्यावरच महाविकास आघाडी तुटली, काही नेत्यांनी पक्षांतर केले आणि प्रचारातही काँग्रेस नेतृत्व उदासीन राहिले. परिणामी, काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. एकेकाळी सत्तेचा अनुभव घेतलेल्या काँग्रेसचे नवी मुंबईतील अस्तित्व आता अखेरच्या घटिका मोजत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र होत आहे.

जिल्हाध्यक्षांवर नाराजी
या पराभवानंतर काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात जिल्हाध्यक्ष रामचंद्र दळवी यांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नियोजनाचा अभाव, कार्यकर्त्यांना डावलणे आणि पराभवाची जबाबदारी इतर घटकांवर ढकलण्याची भूमिका यामुळे पक्ष अधिक कमकुवत झाल्याची भावना आहे. येत्या काळात काँग्रेस नेतृत्व यावर आत्मपरीक्षण करणार की अंतर्गत कलह वाढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
----------------------------------------
कोट
उबाठा गटाने आम्हाला विश्वासात न घेता उमेदवार घोषित केले. काँग्रेसच्या २९ डिसेंबरला अर्ज तपासण्यासाठी बोलवले होते; परंतु कोणी अर्ज तपासणी करण्यासाठी आले नाही. प्रदेशाध्यक्षांना सर्व माहिती देत निर्णय घेत होतो, त्यामुळे त्यांची दिशाभूल केली, असे म्हणता येणार नाही.
- रामचंद्र दळवी, माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com