आधुनिक शेतीची ओळख
आधुनिक शेतीची ओळख
‘नन्ही कली’ उपक्रमातील मुलींनी घेतला कृषी विज्ञानाचा अनुभव
वाणगाव, ता. २२ (बातमीदार) : आश्रमशाळेतील मुलींना शालेय शिक्षणाबरोबरच आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने नांदी संस्थेच्या वतीने ‘नन्ही कली’ उपक्रम राबवण्यात येत आहे. नुकतीच या उपक्रमाअंतर्गत डहाणू तालुक्यातील विविध आश्रम व जिल्हा परिषद शाळांमधील सहावी ते दहावी इयत्तेतील सातशे ९० मुलींसाठी कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रास भेट आयोजित करण्यात आली होती.
या भेटीदरम्यान मुलींना कृषी विज्ञान केंद्रातील माहिती तंत्रज्ञान केंद्र, गांडूळखत निर्मिती, शेळी पालन, मधमाशी पालन, भाजीपाला लागवड, फुलशेती, अळंबी उत्पादन अशा विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने मुलींच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून आला. या शैक्षणिक दौऱ्यात केंद्राचे शास्त्रज्ञ अशोक भोईर, प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रशांत वरठा यांनी मुलींना पिकांची लागवड, मृदा परीक्षण, बियाण्यांची निवड, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. शेतीतील प्रत्यक्ष कामकाज पाहताना अनेक प्रश्न विचारत मुलींनी आपली जिज्ञासा व्यक्त केली. शेतातील विविध पिकांचे प्रकार, भाजीपाला लागवड, फळबागांचे व्यवस्थापन आणि कीड-रोग नियंत्रण याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी प्रक्षेत्रावर उभारलेल्या प्रात्यक्षिक ठिकाणी भेट देताना मुलींना आधुनिक शेतीतील ठिंबक सिंचन, सेंद्रिय आच्छादन घालण्याची शेती पद्धत, तापमान व आर्द्रता नियंत्रित करून पिकांची लागवड करण्याची पद्धत आणि सेंद्रिय खतांचा वापर प्रत्यक्ष दाखवण्यात आला. अनेक मुलींनी पहिल्यांदाच आधुनिक शेती तंत्रज्ञान पाहिले. शेती म्हणजे केवळ कष्टाचे काम नसून विज्ञान, तंत्रज्ञान आणि नियोजनाचा एकोपा आहे, ही जाणीव मुलींमध्ये निर्माण झाल्याचे फाऊंडेशनच्या कार्यक्रम अधिकारी सुनीता शर्मा यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनच्या कौशल्य सहयोगी मानसी शिंगडा, तेजल राहे, कल्पना मेऱ्या, जस्मिनी राबड, निकिता हाडल आणि गीता इरिम यांनी विशेष मेहनत घेतली.
------------------
चौकट
कृषी क्षेत्रात व्यवसायाच्या संधी
या भेटीदरम्यान कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी शेतीमध्ये महिलांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी शेती, प्रक्रिया उद्योग, उद्योजकता आणि स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून कसे यश मिळवले आहे, याची उदाहरणे मुलींना सांगण्यात आली. त्यामुळे कृषी क्षेत्रात विविध व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध असल्याची जाणीव मुलींना झाली. कृषी प्रक्षेत्रास दिलेल्या या भेटीमुळे शाळकरी मुलींमध्ये शेतीविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून, शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवाचे महत्त्व अधोरेखित झाल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

