माघ शुद्ध चतुर्थीचा मंगलमय महोत्सव

माघ शुद्ध चतुर्थीचा मंगलमय महोत्सव

Published on

गणरायाच्या जयघोषात टिटवाळा दुमदुमले
माघ गणेश जन्मोत्सव सोहळा भक्तिभावात
टिटवाळा, ता. २२ (वार्ताहर) : माघ शुद्ध चतुर्थीच्या मुहूर्तावर गुरुवारी (ता. २२) टिटवाळा येथे श्री गणेश जन्मोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात आणि अपूर्व उत्साहात साजरा झाला. दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी गणरायाचा जन्मोत्सव सोहळा पार पडला, ज्याचा साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविकांनी टिटवाळ्यात गर्दी केली होती. उत्सवानिमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांचा महापूर लोटला होता. पहाटेच्या विशेष कीर्तनाने दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर मंगल स्नान, अभिषेक आणि विशेष पूजाअर्चा करण्यात आली. मंत्रोच्चार, शंखनाद आणि घंटानाद यामुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भारून गेला होता.

दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी गणरायाच्या जन्माचा पावन क्षण आला. फुलांची उधळण आणि भक्तांच्या जयघोषात जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर भव्य महाआरती पार पडली. दुपारच्या सत्रात रंगलेल्या भजन आणि संतवाणीच्या कार्यक्रमाने भाविकांना भक्तिरसाची अनुभूती दिली. संध्याकाळी ७ वाजता श्रींचा पालखी सोहळा निघाला. पारंपरिक वाद्यांचा गजर, आकर्षक विद्युत रोषणाई आणि गुलालाची उधळण यामुळे पालखी सोहळ्याची शोभा अधिकच वाढली होती. टिटवाळ्याच्या मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या पालखीमध्ये आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

परंपरा आणि श्रद्धेचा संगम
महोत्सव केवळ धार्मिक सोहळा न ठरता परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारा ठरला. दिवसभर चाललेल्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे भाविकांच्या मनात भक्तीची नवी ऊर्जा निर्माण झाली. टिटवाळानगरी आज खऱ्या अर्थाने मंगलमय झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com