पोयनाड परिसरात माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा
पोयनाड परिसरात माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा
पोयनाड, ता. २२ (बातमीदार) : माघ शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश जयंतीनिमित्त अलिबाग तालुक्यातील पोयनाड परिसरात भक्तिमय वातावरणात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने परिसरातील विविध गावांमध्ये सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली.
गणेश जयंतीच्या दिवशी अनेक ठिकाणी अभिषेक, पूजा, होमहवन, गणेश जन्मसोहळा, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, सत्यनारायण महापूजा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पोयनाड बाजारपेठेतील तलाव पाळी येथील श्री गणपती मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या सुमारास भक्तिभावात गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पोयनाड परिसरातील अनेक गावांमध्ये सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळांच्या वतीने दीड व अडीच दिवसांच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. तसेच अनेक घरांमध्येही माघी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सायंकाळच्या वेळी विविध ठिकाणी पालखी सोहळे, भजन, कीर्तन व हरिपाठाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. हा माघी गणेशोत्सव पोयनाडसह पेझारी, धेरंड, शहापूर, कमळपाडा, बांधण, कुसुंबळे, आवेटी, दळवी-खरोशी, ताडवागळे, हाशिवरे, कामार्ले, तीनवीरा आदी गावांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परिसरातील अनेक गणेशभक्तांनी सकाळीच अलिबाग येथील कुलाबा किल्ल्यातील गणपतीचे तसेच अष्टविनायकांपैकी सातवे महड येथील वरदविनायक आणि आठवे पाली येथील बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेतले. तसेच प्रत्येक गावातील गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने गणेश जयंती साजरी केली. या निमित्ताने पोयनाड परिसरात धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

