महापौरपदांच्या शर्यतीत ‘श्रीमती’

महापौरपदांच्या शर्यतीत ‘श्रीमती’

Published on

महापौरपदांच्या शर्यतीत ‘श्रीमती’
ठाणे, कल्याण-डोंबिवलीत महिलाराजची शक्यता; उल्हासनगरात समसमान संधी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : मुंबईसह २९ महापालिकांच्या महापौर पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, मिरा- भाईंदर आणि भिवंडी या तीन महापालिका खुल्या वर्गासाठी मोकळ्या झाल्या आहेत; मात्र ठाणे महापालिकेसाठी अनुसूचित जाती सर्वसाधारण, कल्याण-डोबिवली महापालिकेसाठी अनुसूचित जमाती सर्वसाधारण तर उल्हासनगरात नागरिकांचा मागास वर्ग असे महापौरपदांचे आरक्षण पडले आहे. या तिन्ही महापालिकांत शिवसेना शिंदे गटाचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पण महापौर पदाची माळ ही श्रीमानऐवजी श्रीमतींच्याच गळ्यात पडण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी नगरसेवकांपेक्षा नगरसेविका अधिक सक्षम असल्याचे दिसून येत असून, शर्यतीमध्ये अनेकांची नावे चर्चेत आली आहेत.
...............................

ठाण्यात पाच नावे, दोघींमध्ये चुरस
ठाणे, ता. २२ : ठाणे महापालिका निवडणूक संपल्यानंतर महापौरपदाच्या शर्यतीत अनेक दिग्गज होते; मात्र हे पद अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्याने महापौर बनण्याचे अनेकांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. तर शर्यतीत कधीच नसलेल्यांची ‘लॉटरी’ लागणार आहे. विशेष म्हणजे अनुसूचित जातीच्या नगरसेवकांपेक्षा नगरसेविकांची संख्या जास्त आहे. जुन्या जाणत्या नगरसेविकांसह पहिल्यांदाच निवडणूक लढवून सभागृहात येणाऱ्या नवख्या नगरसेविकांनाही अनपेक्षित महापौर बनण्याची संधी चालून आली आहे. यामध्ये डॉ. दर्शना जानकर, विमल भोईर, पद्मा भगत, आरती गायकवाड आणि वनिता घोगरे या पाच नावांची चर्चा आहे. तर अनुभवी विमल भोईर आणि नवख्या डॉ. दर्शना जानकर यांच्यात चुरस आहे.

ठाणे महापालिकेच्या ३३ प्रभागांतील १३१ नगरसेवक पदांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. यात शिवसेना शिंदे गटाने सर्वाधिक ७५ नगरसेवक निवडून आणले आहेत. त्यामुळे ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचा महापौर निर्विवाद बसणार आहे. पण महापौरपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आरक्षण जाहीर झाल्यानंतर यासंदर्भातील पहिला सस्पेन्स संपला आहे. महापौरपद अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाले आहे. पालिका निवडणुकीत या प्रवर्गासाठी नऊ जागा आरक्षित होत्या. त्यापैकी पाच जागा या महिलांसाठी तर चार सर्वसाधारण गटासाठी होत्या. या नऊपैकी सात नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे निवडून आले आहेत. त्यामुळे महापौर पदासाठी शिवसेनेकडे अर्धा डझन नावे आहेत. त्यापैकी प्रभाग क्रमांक ९ अ मधील गणेश कांबळे आणि प्रभाग क्रमांक २८ अ मधील दीपक जाधव हे दोन नगरसेवक वगळता पाच नगरसेविका आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेत महिलाराज येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

प्रमुख दावेदार
- नगरसेविका डॉ. दर्शना जानकर या प्रभाग क्रमांक १६ ‘अ’मधून निवडून आल्या आहेत. नगरसेवक योगेश जानकर यांच्या त्या पत्नी असून, त्यांनी या वेळी पहिल्यांदाच निवडूक लढवून ती जिंकली आहे. जानकर कुटुंब हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जाते. त्यात दर्शना जानकर या डॉक्टर असल्याने उच्च शिक्षित चेहरा ठरू आहेत. ‘काकी’ अशी ख्याती असलेल्या विमल भोईर यांचे नावही महापौर पदासाठी चर्चेत आले आहे. वर्तकनगर येथून सलग दुसऱ्यांदा निवडून येणाऱ्या त्या नगरसेविका आहेत. सभागृहाच्या कामकाजाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

- प्रभाग क्रमांक ३ ‘अ’मधील पद्मा भगत यासुद्धा शर्यतीत आहेत. पण या प्रभागातून गेल्या वेळी मीनाक्षी शिंदे यांना महापौर बनण्याचा मान मिळाला होता. त्यामुळे पुन्हा त्याच प्रभागाला हा बहुमान मिळेल अशी शक्यता कमी दिसते.
- वनिता घोगरे आणि आरती गायकवाड या दोन्ही नगरसेविका दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत; मात्र त्या राष्ट्रवादीतून शिवसेना शिंदे गटात आल्याने त्यांना संधी मिळेल असे दिसत नाही. या दोन नावांना विरोध होण्याची शक्यता आहे.
- शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग ९ ‘अ’चे नगरसेवक गणेश कांबळे आणि प्रभाग २८ ‘अ’चे नगरसेवक दीपक जाधव हे आणखी दोन उमेदवार शिंदे गटाकडे आहेत. हे दोघेही सलग निवडून आले आहेत; पण सभागृहात त्यांची एकूण कामगिरी पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना संधी देतील ही आशा धुसर आहे.

६९ महिला नगरसेविका
ठाणे पालिकेच्या १३१ नगरसेवकांपैकी सर्वाधिक ६९ महिला नगरसेविका आहेत. यामध्ये सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या ७५ पैकी ४० नगरसेविका आहेत.
महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले असून, येथेही सहा महिला नगरसेविका असून दोन नगरसेवक आहेत.
महापौरपदासाठी सुशिक्षित चेहरा देण्यासोबतच महिला कार्ड खेळल्यास कामकाजात शिस्त येऊ शकते, असा विचार केला जाऊ शकतो.
.....................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com