शिंदेंच्या दोन शिलेदारांत चुरस

शिंदेंच्या दोन शिलेदारांत चुरस

Published on

शिंदेंच्या दोन शिलेदारांत चुरस
मनसेच्या आशा पल्लवित
डोंबिवली, ता. २२ : कल्याण-डोंबिवली महारपालिकेच्या इतिहासात प्रथमच महापौरपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. या प्रवर्गातून निवडून आलेले शिंदे गटाचे दोन नगरसेवक सध्या शर्यतीत आघाडीवर असले तरी मनसेच्या शीतल मंढारी यांच्या रूपाने तिसरा पर्यायही चर्चेत आल्याने सत्तेचा सस्पेन्स वाढला आहे.

शिवसेना शिंदे गटाकडे या प्रवर्गातील दोन नगरसेवक असून, दोघांचीही जमेची बाजू भक्कम आहे. दुसऱ्यांदा निवडून आलेल्या हर्षाली थवील यांना महापालिका कारभाराचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी आपल्या प्रभागात सात कोटींचा निधी आणून विकासकामे मार्गी लावली आहेत. महासभेत प्रभागाचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या अभ्यासू नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. तर कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवि पाटील यांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून किरण भांगले ओळखले जातात. उच्चशिक्षित आणि तरुण नेतृत्व असलेल्या किरण यांनी पहिल्याच प्रयत्नात ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव करून आपली ताकद सिद्ध केली आहे.

शिंदे गटाला मनसेने पाठिंबा जाहीर केल्याने सत्तेचे पारडे फिरले आहे. मनसेच्या शीतल मंढारी यांनी शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला आहे. राजकीय चर्चांनुसार पाठिंब्याच्या बदल्यात मनसेने काही महत्त्वाच्या पदांची मागणी केली असल्याची शक्यता आहे. अशात किंगमेकर ठरलेल्या मनसेला खूश करण्यासाठी शीतल मंढारी यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

भाजपची भूमिका ठरणार कळीची!
भाजपची या आरक्षणाने गोची झाली असली तरी ते आपली राजकीय खेळी खेळू शकतात. शीतल मंढारी यांनी निवडणूक जिंकल्यावर भाजप आमदार सुलभा गायकवाड यांची भेट घेतली होती. त्यामुळे शिंदे गटाचे वर्चस्व कमी करण्यासाठी भाजप मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत आग्रही राहू शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रशासकीय अनुभव की राजकीय निष्ठा?
आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनुभवी हर्षाली थवील, तरुण तडफदार किरण भांगले की मनसेच्या शीतल मंढारी यापैकी कोणाची वर्णी लागते, यावर कल्याण-डोंबिवलीच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com