ठाणे रेल्वे स्थानकात चोरीच्या घटनांमध्ये वाढ

ठाणे रेल्वे स्थानकात चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Published on

ठाणे रेल्वे स्थानकात चोरीच्या घटनांमध्ये वाढ
प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना; गस्‍त वाढवण्याची मागणी
ठाणे, ता. २२ (बातमीदार) : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना लक्ष्य करून होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर येत आहे. अवघ्या काही दिवसांत मोबाईल चोरी आणि सँगबॅग चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पहिली घटना ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोन वर घडली. कोपरी येथे राहणारे मोहित कन्हैयालाल कुमार (वय २०) हे कामानंतर थकव्यामुळे फलाट क्रमांक ०२ वरील सीएसटीएम बाजूकडील कट्ट्यावर बसले होते. थकवा आल्याने त्यांना काही काळ डुलकी लागली. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पँटच्या खिशातून सुमारे १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरी केला. जाग आल्यावर मोबाईल नसल्याचे लक्षात येताच त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, मात्र मोबाईल मिळून आला नाही. अखेर त्यांनी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. दुसरी घटना ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठ वर घडली. मुलुंड येथे राहणारे आलम अहमद शेख (वय ४५) हे २० जानेवारी रोजी कामाख्या- ठाणे अप डिब्रुगड एक्सप्रेसने प्रवास करून सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ठाणे स्थानकावर उतरले. प्रवासादरम्यान त्यांनी आपली सँगबॅग डब्यातील रॅकवर ठेवली होती. मात्र गाडीतून उतरताना ती सँगबॅग अचानक गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या सँगबॅगमध्ये जुने कपडे, सुमारे १४ हजार रुपये किमतीचा मोबाईल, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, बँकेचे चेकबुक आणि दुसऱ्या बँकेचे पासबुक अशी महत्त्वाची कागदपत्रे होती. या प्रकरणीही ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे. ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील अत्यंत गजबजलेले स्थानक असून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. अशा ठिकाणी वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने प्रवाशांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच रेल्वे प्रशासन व पोलिसांनी सीसीटीव्ही देखरेख वाढवून गस्त मजबूत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com