बनावट रेल्वे विजिलन्स निरीक्षक अटक, २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले..
बनावट निरीक्षकाला अटक
२० हजारांची लाच घेताना पकडले
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) ः कल्याण रेल्वे स्थानकावर गुरुवारी (ता. २२) मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने मोठी कारवाई करीत बनावट रेल्वे बोर्ड विजिलन्स निरीक्षकाला लाच घेताना अटक केली. अटक करण्यात आलेल्याचे नाव हरीश कांबळे असे आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका रेल्वे कर्मचाऱ्याने दक्षता विभागाकडे तोंडी तक्रार केली होती. एक व्यक्ती स्वतःला रेल्वे बोर्डाचा विजिलन्स निरीक्षक असल्याचे सांगून धमकावत पैसे मागत आहे. या तक्रारीच्या आधारे मध्य रेल्वे विजिलन्स पथकाने कल्याण स्थानकावर सापळा रचला. गुरुवारी कल्याण रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल येथे हरीश कांबळे याला २० हजार रुपये स्वीकारताना पथकाने पकडले. मुंबई येथील डीआरएम कार्यालयातून थकीत देयक मंजूर करून देण्यासाठी ही रक्कम घेत असल्याचा दावा आरोपीने केला होता. तपासात असेही उघडकीस आले आहे, की काही महिन्यांपूर्वी याच रेल्वे कर्मचाऱ्याकडून आरोपीने ६० हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम फोन-पेच्या माध्यमातून त्याच्या खात्यात जमा करण्यात आली होती. पथकाने प्राथमिक चौकशीनंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. विशेष म्हणजे, हरीश कांबळे याच्यावर २०१२ मध्ये मुंबई रेल्वे पोलिस ठाण्यात बनावट टीसी (तिकीट तपासनीस) म्हणून वावरल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामागे एखादे मोठे फसवणूक रॅकेट कार्यरत आहे का, याचा शोध सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

