माजी मूकबधिर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या पत्नीची न्यायालयात धाव

माजी मूकबधिर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या पत्नीची न्यायालयात धाव

Published on

खऱ्याखुऱ्या ‘इक्बाल’च्या नशिबी उपेक्षा
माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या पत्नीची न्यायालयात धाव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : माजी मूकबधिर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू यशवंत उर्फ बाबा सिद्धये यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारने कोणताही पुरस्कार किंवा शासकीय लाभ, पेन्शन दिलेली नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही (बीसीसीआय) त्यांचा विसर पडला आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेची नुकतीच दखल घेतली आणि राज्य सरकार व बीसीसीआयला नोटीस बजावली. २० वर्षांपूर्वी सिद्धये यांच्या जीवनावर ‘इक्बाल’ चित्रपट आला होता.
बाबा सिद्धये यांची ८७ वर्षीय पत्नी प्रमोदिनी आणि मुलगा प्रवीण यांनी ही याचिका केली आहे. एक उत्तम खेळाडू असूनही बीसीसीआयने त्यांना पेन्शनच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. त्यांच्या योगदानाची राज्य सरकारनेही दखल घेतलेली नाही, त्यामुळे त्यांना किमान मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरव करावा, अशी मागणी याचिकेतून केली आहे. त्याची दखल घेऊन न्या. मकरंद कर्णिक आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने बीसीसीआयसह राज्य सरकारला नोटीस बजावली. तसेच सर्व प्रतिवादींना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देऊन सुनावणी १२ फेब्रुवारीला ठेवली.

‘इक्बाल’ चित्रपटामुळे नावलौकिक, पण...
जवळपास २० वर्षांपूर्वी बाबा सिद्धये यांच्या जीवनावर आधारित श्रेयस तळपदे अभिनीत आणि नाशेग कुकूनूर दिग्दर्शित ‘इक्बाल’ चित्रपट आला होता. हा चित्रपट आजही उदयोन्मुख खेळाडूसाठी प्रेरणादायी आहे; मात्र वास्तवातील ‘इक्बाल’ यांच्या पदरी मात्र उपेक्षाच पडली आहे. चित्रपट निर्मात्यांनीही बाबांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना कुठेही श्रेय दिले नसल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

बाबा सिद्धये यांची पार्श्वभूमी
बाबांचा जन्म १९३२ मध्ये इराण येथे झाला. कालांतराने त्यांचे कुटुंबीय कोकणात आले. बाबा हे जन्मापासून मूकबधिर होते; मात्र त्यांनी मेहनत करून क्रिकेटमध्ये कीर्ती मिळवली. १९५२ ते १९६८ दरम्यान, वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका विरुद्ध पाचदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. २४ नोव्हेंबर २००२ मध्ये बाबांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्म पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार मिळायला हवा होता, अशी मागणीही याचिकेत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com