अवैध गर्भपात औषधांच्या रॅकेटचा भंडाफोड

अवैध गर्भपात औषधांच्या रॅकेटचा भंडाफोड

Published on

अवैध गर्भपात औषधांचे रॅकेट उघड
डमी रुग्ण पाठवून आरोग्य विभागाची धडक कारवाई
नालासोपारा, ता. २३ (बातमीदार) : नालासोपारा येथील अचोले रोड परिसरात सुरू असलेल्या एका रुग्णालयात वैद्यकीय नियमांची पायमल्ली करत अवैध गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पालिका आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हा काळा कारभार रंगेहाथ पकडण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. संजीव सिंह, डॉ. चंद्रकांत शंभूनाथ मिश्रा आणि अरुण शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (ता. २२) वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुधीर पांढरे व डॉ. कृष्णा गोसावी यांचा समावेश असलेल्या विशेष पथकाने संबंधित रुग्णालयावर छापा टाकला. याआधी रुग्णालयातील प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून एक डमी रुग्ण पाठवण्यात आला होता. तपासादरम्यान कोणतीही वैध कागदपत्रे किंवा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (एमटीपी) परवाना नसताना गर्भपाताची प्रक्रिया सुरू करून औषधे देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पथकाने तत्काळ छापा टाकत कारवाई केली. तपासात रुग्णालयातील काही कर्मचारी अपात्र असल्याचेही उघड झाले आहे.
प्राथमिक तपासात मुख्य आरोपी डॉ. संजीव सिंह हे कोणताही वैध परवाना नसताना एमटीपीसाठीची औषधे विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले. नियमानुसार ही औषधे केवळ अधिकृत केंद्रांवरच वापरण्याची परवानगी आहे. डॉ. सिंह यांनी ही औषधे ‘केअर अँड क्युअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चे अरुण शुक्ला यांना देणे अपेक्षित असताना ती डॉ. चंद्रकांत मिश्रा यांच्या रुग्णालयात अवैधरीत्या विकली जात होती. संबंधित रुग्णालयाकडे शासनमान्य गर्भपात केंद्राचा परवाना नसल्याचेही समोर आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महिलांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा असून हे रॅकेट किती काळापासून सुरू होते आणि आतापर्यंत किती महिलांचे जीव धोक्यात आले याचा सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती मनपा आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, परिसरातील इतर अवैध गर्भपात केंद्रांवरही कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com