भायखळ्याच्या पीपल्स इंग्लिश नाईट हायस्कूलने पटकावला मासूम चषक
भायखळ्याच्या पीपल्स इंग्लिश नाइट हायस्कूलने पटकावला ‘मासूम चषक’
धारावी, ता. २५ (बातमीदार) : मुंबईतील रात्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरलेल्या मासूम संस्थेतर्फे काळाचौकी येथील अहिल्या नाइट हायस्कूलमध्ये आयोजित शैक्षणिक प्रदर्शनात भायखळा येथील सुप्रसिद्ध पीपल्स इंग्लिश नाइट हायस्कूलने निर्विवाद यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला आणि मासूम चषकावर आपले नाव कोरले.
या प्रदर्शनात इंग्रजी, विज्ञान, मराठी, भूगोल, गणित या विषयांसह पर्यावरणीय प्रश्न, सामाजिक समस्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प सादर करण्यात आले होते. या सर्व विभागांतील सर्जनशील व दर्जेदार सादरीकरणामुळे पीपल्स नाइट हायस्कूलने मोठ्या दिमाखात प्रथम क्रमांक मिळवला. ‘मासूम’च्या संचालिका निकिता केतकर यांच्या हस्ते विजेत्या पीपल्स इंग्लिश नाइट हायस्कूलला चषक प्रदान करण्यात आला. या वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक करण्यात आले.
स्पर्धेत न्यू एरा नाइट स्कूलने द्वितीय, संत ज्ञानेश्वर नाइट स्कूलने तृतीय, युनिव्हर्सल नाइट स्कूलने चतुर्थ, तर अहिल्या नाइट स्कूलने पाचवा क्रमांक पटकावला. यंदा हुकलेला प्रथम क्रमांक पुढील वर्षी मिळवू, असा निर्धार सहभागी शाळांनी व्यक्त केला. या ईआरजी प्रदर्शनात विविध रात्रशाळांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेले एकूण ३० प्रकल्प विशेष ठरले. निकिता केतकर यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, दिवसा नोकरी-व्यवसाय व विविध कामे करूनही शिक्षणाचा आलेख उंचावणाऱ्या या मेहनती विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले.
या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या परवीन आसिफ खान म्हणाल्या, पीपल्स इंग्लिश नाइट हायस्कूलने प्रथम पुरस्कार जिंकून सर्वांनाच गोड धक्का दिला. या प्रकल्पांसाठी शाळेच्या शिक्षिका झेबा मणियार, सना राऊत, नम्रा कुरेशी तसेच शिक्षक ज्ञानेश्वर माने यांनी कुशल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी एकूण सहा प्रकल्प सादर केले होते. निर्णय प्रक्रियेत सर्जनशीलता, वैज्ञानिक अचूकता, सादरीकरण, टीमवर्क आणि एकूण परिणामकारकता हे निकष लावण्यात आले होते. या यशाबद्दल शाळेचे विश्वस्त शरीफ खान यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले.
निकिता केतकर म्हणाल्या, सर्वच शाळांतील प्रकल्प उत्तम असल्याने विजयी प्रकल्प निवडताना परीक्षकांचा कस लागला. शाळाबाह्य व अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना रात्रशाळेत संधी देऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आमचे प्रयत्न यशस्वी होताना पाहून आनंद वाटतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

