महापौर पदासाठी चार जणांची दावेदारी
महापौरपदासाठी चौघांची दावेदारी
‘पाटील-शेट्टी’ यांच्यासह ‘धक्कातंत्रा’चीही चर्चा
संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. २४ : वसई-विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीने काँग्रेसच्या सोबतीने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला असला, तरी आता ‘महापौर’ कोणाला करायचे, यावरून पक्षात मोठी चुरस निर्माण झाली आहे. या पदासाठी सध्या चार प्रमुख चेहरे रेसमध्ये असून, हितेंद्र ठाकूर यांच्या पसंतीची मोहर कोणावर उमटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील यांचे नाव सध्या सर्वात आघाडीवर आहे. बविआचे सचिव आणि समन्वयक म्हणून त्यांची पकड मजबूत आहे. यंग स्टार ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्यात ते सक्रिय असतात. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे बंधू असलेले पाटील यांचे विरोधकांशीही सलोख्याचे संबंध असल्याने त्यांची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी आपल्या मागील कार्यकाळात कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. ठाकूर कुटुंबाचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. प्रशासकीय कामाचा अनुभव आणि लोकाभिमुख प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.
पाणी समिती सभापती प्रफुल्ल साने यांनी शहरातील सर्वात महत्त्वाच्या अशा ‘सूर्या पाणीपुरवठा योजने’वर प्रभावीपणे काम केले आहे. वसई-विरारचा पाणीप्रश्न सोडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याने, अभ्यासू चेहरा म्हणून त्यांच्या नावाचाही गांभीर्याने विचार सुरू आहे. तसेच प्रभाग समिती सभापती कन्हैया भोईर यांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे. माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या अत्यंत विश्वासातील तरुण नेतृत्व म्हणून त्यांचे नाव चर्चेत आहे.
कणखर नेतृत्वाच्या शोधात
हितेंद्र ठाकूर हे नेहमीच अनपेक्षित निर्णयांसाठी ओळखले जातात. वरील चार नावांव्यतिरिक्त ते ऐनवेळी एखादा नवीन चेहरा समोर आणून राजकीय ‘धक्का’ देतात का, याचीही उत्सुकता नगरसेवकांमध्ये आहे. विरोधकांचे वाढलेले संख्याबळ पाहता, त्यांना सभागृहात रोखू शकेल, अशा कणखर नेतृत्वाच्या शोधात बविआ आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

