केईएमच्या नामांतरावर वाद

केईएमच्या नामांतरावर वाद

Published on

केईएमच्या नामांतरावर वाद
नाव बदलल्यामुळे जागतिक ओळख, इतिहास पुसला जाण्याची भीती
भाग्यश्री भुवड, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबईतील केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाचे नाव बदलण्याचा सूचना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. यावरून वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे. केईएमसारख्या जागतिक कीर्तीच्या संस्थेचे नामांतर करण्याचा विषय केवळ प्रशासकीय निर्णयाशी संबंधित नसून, त्याचा व्यापक परिणाम रुग्णालयाच्या इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि शैक्षणिक अंगावर होईल, अशी भीती केईएमच्या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

केईएमच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात जगभरात आपले नाम कमावले आहे. त्यामुळे केईएम हे नाव जगभरात ओळखलं जातं. या नावावर आधारित विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रं, डॉक्टरांची ओळख आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता जोडलेली आहे. त्यामुळे नाव बदलल्यास विद्यार्थी, शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांना अनेक व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे केईएमच्या माजी विद्यार्थ्यांच्या म्हणणे आहे.

गैर नाही
दुसरीकडे केईएम हे नाव ब्रिटिश वसाहतवादी काळातील वारशाचं प्रतीक आहे. भारताने स्वातंत्र्यानंतर अनेक शहरं आणि संस्थांची नावं बदलून स्थानिक संस्कृती आणि महापुरुषांचा सन्मान जपला आहे. त्यामुळे डी-कॉलोनायझेशनच्या (वसाहत ओळख पुसणे) प्रक्रियेत केईएमचं नामांतर योग्य ठरू शकतं, असा विचार काही तज्ज्ञांनी मांडला आहे. मुंबईतील अनेक ऐतिहासिक वास्तूंचे नामकरण मराठीत झालेले आहे. त्यामुळे केईएमचे नाव बदलल्यास काही हरकत नसावी, असेही काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

नामांतराचे राजकारण नको
​​मुंबईची लोकसंख्या दोन कोटींच्या घरात आहे, मात्र बेडची संख्या केवळ ५० हजार आहे. यापैकी महापालिकेच्या रुग्णालयांत फक्त १५ हजार बेड उपलब्ध आहेत.​स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत आपण फक्त एका मेडिकल कॉलेजची भर घातली आहे. त्यामुळे केवळ नावांच्या राजकारणात न अडकता आरोग्याच्या भीषण स्थितीकडे लक्ष देण्याचे आवाहन केईएमचे माजी विद्यार्थी असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी मंत्री लोढा यांना केले.

नामांतरावर उतारा
‘किंग एडवर्ड मेमोरियल’ हा पूर्ण उल्लेख टाळून केवळ ‘केईएम’ किंवा मराठीत ‘केम’ असा वापर सुरू ठेवण्यामुळे ऐतिहासिक संदर्भ कमी होतील, पण संस्थेची ओळख आणि विश्वास अबाधित राहील. एकूणच केईएम रुग्णालयाच्या नामांतराचा प्रश्न हा इतिहास पुसण्याचा नसून, इतिहास, राष्ट्रीय अस्मिता आणि व्यवहार्य अडचणी यांचा समतोल साधण्याचा असल्याचे या चर्चेतून स्पष्ट होत आहे.
..
केईएम हे नाव जगभर ओळखलं जातं. ते बदलल्यास विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आंतरराष्ट्रीय ओळखीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
डॉ. अविनाश सुपे, माजी अधिष्ठाता, केईएम
...
ब्रिटिश काळात जे. जे. हॉस्पिटलमध्ये भारतीयांना उपचार व शिक्षणासाठी प्रवेश नव्हता. त्या पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी केईएम रुग्णालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे केईएमचं नाव आज रुग्णांच्या स्मृतींमध्ये आणि लोकस्मृतीत खोलवर रुजलेलं आहे.
- डॉ. हेमंत देशमुख, माजी अधिष्ठाता
.....
लोढा यांनी उभारलेल्या उत्तुंग टॉवर्सना बेलमांडो, पॅलाझिओ, अल्टा माउंट, कासा बेला अशी नावे देण्याऐवजी आपल्या मातीतील संस्कृतीची नावे का दिली नाहीत? ​अनेक पिढ्यांचे डॉक्टर घडवणाऱ्या या ऐतिहासिक संस्थेच्या नामांतरापेक्षा आरोग्यसेवा सुधारण्याला प्राधान्य द्यावे.
डॉ. अमोल कोल्हे, खासदार, माजी विद्यार्थी केईएम
..
आमची ओळख केईएममुळे आहे. त्यामुळे नाव बदलण्याच्या सूचनेवर पुनर्विचार व्हावा.
- अमर अगमे, अध्यक्ष, केईएम मार्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com