बेकायदा शाळांवर कारवाईची कुऱ्हाड

बेकायदा शाळांवर कारवाईची कुऱ्हाड

Published on

पनवेल, ता. २४ (वार्ताहर) : मान्यता प्रमाणपत्राशिवाय शाळा चालवून विद्यार्थ्यांकडून फी वसूल करीत सरकार, पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या पनवेल तालुक्यातील पाच शाळांच्या संस्थाचालक, अध्यक्ष व संचालकांविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शाळांनी सरकारची मान्यता नसताना अनधिकृतपणे शाळा चालवून शिक्षण हक्क कायद्याचे (आरटीई) उल्लंघन केल्यामुळे या शाळांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अनधिकृत शाळा चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८ नुसार, कोणतीही शाळा शासन किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या मान्यता प्रमाणपत्राशिवाय चालवता येत नाही. रायगड जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार, गतवर्षी पनवेल शहर परिसरातील शाळांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत पाच शाळांकडे कोणतेही मान्यता प्रमाणपत्र किंवा स्वतंत्र यू-डायस (यूडीआयएसई) क्रमांक नसल्याचे समोर आले. या शाळांनी पालकांना अंधारात ठेवून विद्यार्थी आणि सरकारची फसवणूक केल्याचे चौकशीत आढळून आले आहे. त्यानंतर तत्कालीन गट शिक्षणाधिकारी एस. आर. मोहिते यांनी ११ सप्टेंबर २०२५लाच या शाळांना नोटीस बजावून तत्काळ शाळा बंद करण्याचे आणि विद्यार्थ्यांना जवळच्या मान्यताप्राप्त शाळेत दाखल करण्याचे निर्देश दिले होते. तसेच दंड भरून हमीपत्र सादर करण्यास सांगितले होते.

जून २०२३ पासून हे संस्थाचालक नियमबाह्य पद्धतीने शाळा चालवत असल्याचे केंद्रप्रमुखांच्या अहवालातून समोर आले. प्रत्यक्ष भेटीत या शाळा अद्याप सुरू असल्याचे आढळल्याने अखेर फौजदारी कारवाईचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गट शिक्षणाधिकारी शाहू सतपाल यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पाचही शाळांच्या संस्थापक, अध्यक्ष आणि संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रवेश न घेण्याचे आवाहन
पालकांनी मान्यता नसलेल्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन करतानाच रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही संस्थेची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गुन्हा दाखल झालेल्या शाळांची नावे
- एसजीटी इंटरनॅशनल स्कूल, करंजाडे (सेक्टर-१)
- वेदिक टी इंटरनॅशनल स्कूल, करंजाडे (सेक्टर-३)
- वेदगृह पब्लिक स्कूल, करंजाडे (सेक्टर-३)
- दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल (प्राथमिक), दापोली पारगाव
- दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल (माध्यमिक), करंजाडे (सेक्टर आर-१)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com