लैंगिक शोषणाविरोधात न घाबरता आवाज उठवा

लैंगिक शोषणाविरोधात न घाबरता आवाज उठवा

Published on

लैंगिक शोषणाविरोधात न घाबरता आवाज उठवा
ॲड. रुचिता सामंत शेट्ये यांचे उत्कर्ष विद्यालयात मार्गदर्शन
वसई, ता. २४ (बातमीदार) : लैंगिक शोषण किंवा कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाला सामोरे जावे लागल्यास विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता तात्काळ आवाज उठवावा. अशाप्रसंगी पालक, शिक्षक, विश्वासू व्यक्ती किंवा थेट पोलिसांकडे तक्रार करणे अत्यंत आवश्यक आहे. वेळीच तक्रार केल्यास समाजातील अपप्रवृत्तींचा बंदोबस्त करता येतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. रुचिता सामंत शेट्ये यांनी केले. विरार येथील उत्कर्ष विद्यालयात आयोजित लैंगिक शोषणविरोधी कायदेशीर जनजागृती कार्यक्रमात त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होत्या.
आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांचे संरक्षण, सुरक्षितता आणि त्यांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची जाणीव करून देणे ही काळाची गरज बनली आहे. ही सामाजिक जबाबदारी ओळखून उत्कर्ष विद्यालयाच्या प्रशासनाने दूरदृष्टीपूर्ण आणि स्तुत्य असा उपक्रम राबवला. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका चित्रा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या शिबिरात लैंगिक शोषणविरोधी कायदे, संरक्षणाची तरतूद आणि तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया याबाबत सखोल माहिती देण्यात आली. मार्गदर्शन करताना ॲड. रुचिता सामंत शेट्ये यांनी विद्यार्थ्यांना सोप्या आणि समजेल अशा भाषेत लैंगिक शोषण म्हणजे काय, कोणती वर्तणूक अयोग्य अथवा गुन्हेगारी स्वरूपाची आहे, याची उदाहरणांसह माहिती दिली. शाळा, महाविद्यालय, घर, सार्वजनिक ठिकाणे तसेच ऑनलाइन माध्यमांवर होणारे गैरवर्तन याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. अशा प्रसंगी मौन बाळगण्याऐवजी योग्य व्यक्तीपर्यंत माहिती पोहोचवणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला. विद्यार्थ्यांचे कायदेशीर हक्क, ‘पॉक्सो कायदा’, महिला व बाल संरक्षण कायदे तसेच पोलिसांकडे तक्रार कशी दाखल करावी याचीही माहिती देण्यात आली. तक्रार करताना घाबरून न जाता सत्य मांडावे, पुरावे जपून ठेवावेत आणि गरज पडल्यास कायदेशीर मदत घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com