

भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण
बोईसर, मनोर व सफाळे येथे रेबीज लसीकरण मोहीम
मनोर, ता. २७ (बातमीदार) : पालघर तालुक्यातील ग्रामीण भागात भटक्या श्वानांच्या समस्येवर उपाय म्हणून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बोईसर, मनोर व सफाळे येथे श्वान निर्बीजीकरण व रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २,२९४ भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व लसीकरण पूर्ण झाले आहे.
या निर्बीजीकरण व लसीकरण मोहिमेदरम्यान भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या (एडब्ल्यूबीआय) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत सहा हजार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी जिल्हा परिषदेकडून एक कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. बोईसर येथील केंद्र हे युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर ट्रस्ट, मनोर येथील केंद्र हे नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्था आणि सफाळे येथील केंद्र जेनीस ॲनिमल वेल्फेअर ट्रस्टमार्फत चालवले जात आहे. यावर्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज मोहिमेअंतर्गत शासनाच्या सूचनांनुसार केंद्र-आधारित प्रणाली सुरू झाल्याने श्वान संकलन, निर्बीजीकरण, लसीकरण आणि त्यानंतरची निगा प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित आणि परिणामकारक होणार आहे. केंद्रात श्वान संकलन, तीन ते चार दिवसांची निगा, शस्त्रक्रिया आणि रेबीज लसीकरण प्रशिक्षित तज्ज्ञांकडून केली जात आहे. शस्त्रक्रियेनंतर श्वानांना आवश्यक उपचारानंतर त्याच परिसरात सोडले जात आहे.
चौकट
# जिल्ह्यातील भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण, रेबीज प्रतिबंध आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. तसेच जिल्हाभर स्वच्छ व सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास हातभार लागणार आहे.
# यापूर्वी सलग दोन वर्षे सातपाटी, अर्नाळा, दांडी या समुद्रकिनारी भागात श्वान निर्बीजीकरण तसेच रेबीज लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली होती.
# निर्बीजीकरण आणि लसीकरणाची केंद्रनिहाय संख्या
बोईसर केंद्र १०६२
मनोर केंद्र ९२२
सफाळे केंद्र ३१०
------------------
प्रतिक्रिया,
ग्रामीण भागातील भटक्या श्वानांच्या समस्येवर उपाययोजना करण्याच्या मोहिमेअंतर्गत मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत तिन्ही केंद्रांमध्ये एकूण सहा हजार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मोहिमेसाठी जिल्हा परिषदेकडून एक कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
प्रकाश हसनाळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.