पोलिस हल्ल्याप्रकरणी ११ जणांना तीन वर्षांचा कारावास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पोलिसांवर लोखंडी कोयता, चॉपर, लाकडी दांडके व हॉकी स्टिकने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी ११ जणांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष मोक्का न्यायाधीश व्ही. एस. मोहिते यांनी दोषी ठरवत तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या आरोपींपैकी दोन आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती सरकारी वकील संजय मोरे यांनी दिली. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील कुळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत २४ जून २०१७ मध्ये घडली होती.
शंकर पारधी, भावेन ऊर्फ नाना देशमुख, अंकुश भोजणे, महेश रोकडे, रघुनाथ पारधी, संदीप सोनावणे, विजय विशे, अजय गुप्ता, प्रकाश ऊर्फ पक्या गावंड तसेच मयत देवीदास शिसवे व संजय पारधी (मयत) अशा एकूण ११ जणांचा समावेश या प्रकरणात आहे. आरोपींविरोधात कुळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान ॲड. संजय मोरे यांनी एकूण १६ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून सरकारी पक्षाचा दावा सिद्ध केला. पुराव्यांची गंभीरता लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी तीन वर्षांचा कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणून ठाणे ग्रामीण पोलिस हवालदार विकास पाटील यांनी काम पाहिले.
प्रकरणाची पार्श्वभूमी
अंबरनाथ येथील कुडसावरे वाडीत राहणारे संभाजी पारधी व शंकर पारधी यांच्यात कौटुंबिक कारणावरून दीर्घकाळ वैमनस्य होते. २४ जून २०१७ ला दुपारी संभाजीने शंकर यांच्या घराची तोडफोड करून शिवीगाळ व दमदाटी केली. यानंतर शंकर यांच्या पत्नी रोशनी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आरोपींकडून जीविताला धोका असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांना घरी सोडावे, अशी विनंती त्यांनी केली. त्यानुसार पोलिस हवालदार गोरे, सफौ गोसावी व पोलिस कॉन्स्टेबल भोईर हे त्यांना घरी सोडण्यासाठी गेले. मात्र, आरोपींनी पोलिसांनाच ठार मारण्याची धमकी देत हल्ला केला. हवालदार गोरे यांच्यावर कोयत्याने, सफौ गोसावी यांच्यावर चॉपरने तर कॉन्स्टेबल भोईर यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पोलिसांना गंभीर व साध्या स्वरूपाच्या दुखापती झाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

