उल्हासनगरमध्ये अंतर्गत कुरघोडी भोवली

उल्हासनगरमध्ये अंतर्गत कुरघोडी भोवली

Published on

उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि शिंदे शिवसेना यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. निकालानंतरही हे दोन्ही पक्ष सत्तेच्या अत्यंत जवळ पोहोचले; मात्र बहुमताचा जादुई आकडा त्यांना गाठता आला नाही. विशेष म्हणजे, या अपयशामागे विरोधकांची रणनीती नव्हे, तर पक्षातीलच उमेदवारांनी केलेली प्रचारातील गद्दारी, एबी फॉर्मचा गोंधळ आणि अपक्षांना मिळालेली मूक साथ ही कारणे निर्णायक ठरल्याचे आता उघड होत आहे. काही प्रभागांतील या चुकांनी संपूर्ण निवडणुकीचे गणितच बदलून टाकले.

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेना हे दोन्ही पक्ष सर्वाधिक जागा मिळवूनही बहुमतापासून दूर राहिले. निकालानंतर झालेल्या अंतर्गत चर्चांमधून आणि प्रभागनिहाय विश्लेषणातून हे स्पष्ट झाले की, या अपयशामागे जनतेचा रोष किंवा विरोधकांची ताकद नव्हे, तर उमेदवारांनीच केलेल्या गंभीर राजकीय चुकांचा फटका बसला. शिंदे शिवसेनेच्या बाबतीत प्रभाग क्रमांक १० मध्ये घडलेला प्रकार पक्षासाठी मोठा धक्का ठरला. येथे शिवसेनेच्या चार उमेदवारांपैकी तीन उमेदवारांनी पक्षाच्या अधिकृत महिला उमेदवाराचा प्रचार न करता थेट एका अपक्ष महिला उमेदवाराच्या बाजूने प्रचार केला. परिणामी, शिवसेनेची महिला उमेदवार पराभूत झाली, तर अपक्ष उमेदवारालाही विजय मिळवता आला नाही. या अंतर्गत फुटीमुळे शिवसेनेची एक निश्चित जागा हातातून गेली.
यापेक्षा अधिक गंभीर प्रकार प्रभाग क्रमांक २० मध्ये घडला. शिंदे गटाच्या एका उमेदवाराने आपल्या पॅनलमधील दोन अधिकृत उमेदवारांचा प्रचार पूर्णपणे टाळत दोन अपक्ष उमेदवारांना सोबत घेत खुलेआम पत्रक छापून प्रचार केला. या प्रकारामुळे मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले. त्याचा थेट परिणाम असा झाला की शिंदे गटाने प्रभाग १९ आणि प्रभाग २० मिळून तब्बल सहा जागा गमावल्या. बहुमताच्या शर्यतीत ही चूक निर्णायक ठरली.
या सर्व घटनांचा एकत्रित परिणाम असा झाला की भाजप आणि शिंदे शिवसेना हे दोन्ही पक्ष बहुमताच्या आकड्याच्या अगदी उंबरठ्यावर येऊन थांबले. निवडणुकीनंतर आता दोन्ही पक्षांत तीव्र अंतर्गत नाराजी, शिस्तभंगाच्या तक्रारी आणि जबाबदारी निश्चित करण्याची चर्चा रंगू लागली आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, जर या प्रभागांतील चुका टाळल्या असत्या, तर उल्हासनगर महापालिकेतील सत्तेचे चित्र आज पूर्णपणे वेगळे असते. मात्र, पक्षांतर्गत विस्कळीतपणा आणि वैयक्तिक राजकारणामुळे भाजप आणि शिंदे शिवसेनेला बहुमताचे स्वप्न अपूर्ण ठेवावे लागले आहे.

भाजपला फटका
दुसरीकडे, भाजपही संघटनात्मक गोंधळातून सुटू शकला नाही. प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपने एकाच वेळी दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने निवडणूक आयोगाने एक वैध ठरवला, तर दुसरा बाद केला. या प्रकारामुळे प्रचारात संभ्रम निर्माण झाला आणि भाजपला या प्रभागात दोन जागांचा फटका सहन करावा लागला. असाच प्रकार प्रभाग क्रमांक १९ मध्येही घडला. एका जागेसाठी दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यामुळे एक उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरला, तर दुसरा भाजपचा अधिकृत उमेदवार राहिला. मात्र, मतांची विभागणी झाल्याने दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला, आणि भाजपची संभाव्य जागा वाया गेली.

फोटो :- शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांची चिन्हे घ्यावीत ही विनंती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com