दिवा फाटक मृत्यूचा सापळा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : दिवा रोड येथील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग (दिवा फाटक) हे सध्या मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील अत्यंत धोकादायक आणि वाहतुकीस मोठा अडथळा ठरणारे ठिकाण बनले आहे. दिवा रोड रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) प्रकल्पाला दहा वर्षांहून अधिक काळ होत असलेला विलंब हे या मागील प्रमुख कारण असल्याचा ठपका ठेवला जात आहे. यासाठी मुंबई रेल्वे प्रवासी संघाने थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.
दिवा फाटक परिसरातील गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत तत्काळ भुयारी मार्ग मंजूर करावेत, दिवा आरओबीसाठी वेळबद्ध पूर्णत्वाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करावे, रेल्वे प्रशासन व महापालिका यांच्यातील जबाबदाऱ्या स्पष्ट कराव्यात; तसेच कामाची प्रगती सार्वजनिकरीत्या जाहीर करावी, अशा ठोस मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. यासोबतच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २०१९ पासून काही अंशी काम सुरू झाले असले, तरी वारंवार दिलेल्या आश्वासनांनंतरही दिवा रोड उड्डाणपूल अद्याप वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. परिणामी लाखो प्रवाशांना दररोज प्रचंड गर्दी, सततचा विलंब आणि जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे धावत्या लोकलमधून पडणे, चेंगराचेंगरीसारख्या घटना आणि प्रवाशांचे मृत्यू होण्याचे प्रकार वाढले आहेत. ही परिस्थिती मुंबईसारख्या महानगरासाठी अत्यंत दुर्दैवी असल्याचे संघाने म्हटले आहे. दरम्यान, निवेदनानंतरही प्रशासनाकडून ठोस निर्णय किंवा निश्चित कालमर्यादा जाहीर न झाल्यास, प्रवाशांना शांततामय व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही शेवटी देण्यात आला आहे.
एकेरी वाहतुकीसाठी भुयारी मार्ग
रेल्वे तज्ज्ञांच्या मते, प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून एकेरी वाहतुकीसाठी भुयारी मार्ग अल्प कालावधीत उभारणे शक्य आहे. दिवा पूर्व ते पश्चिम आणि पश्चिम ते पूर्व असे दोन स्वतंत्र एकेरी भुयारी मार्ग युद्धपातळीवर सुरू केल्यास, फाटक बंद राहण्याचा कालावधी कमी होईल, गाड्यांची वेळ सुधारेल, प्रवाशांची गर्दी आटोक्यात येईल आणि अपघातांचा धोका लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. जोपर्यंत कायमस्वरूपी आरओबी सुरू होत नाही, तोपर्यंत हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, असेही नमूद करण्यात आले आहे.
आता केवळ गैरसोयीपुरता हा विषय मर्यादित राहिलेला नाही. तो दररोज जीव धोक्यात घालणारा प्रश्न बनला आहे. प्रवाशांना आश्वासन नव्हे, तर तत्काळ कृती अपेक्षित आहे.
- सिद्धेश देसाई, उपाध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

