मुलं चोरणारी टोळी समजून विरार मध्ये मध विक्री करणाऱ्या ४ महिलांना जमावकडून मारहाण

मुलं चोरणारी टोळी समजून विरार मध्ये मध विक्री करणाऱ्या ४ महिलांना जमावकडून मारहाण

Published on

मुले चोरणाऱ्या समजून महिलांना मारहाण
विरारमध्ये मधविक्री करणाऱ्यांवर जमावाचा संताप

नालासोपारा, ता. २४ (बातमीदार) ः विरारमध्ये मुले चोरीच्या अफवेतून संतप्त जमावाने मधविक्री करणाऱ्या चार महिलांना बेदम मारहाण केल्याची घटना उघड झाली आहे. विरार पूर्व सहकारनगर रिक्षा स्टॅण्डजवळ गुरुवारी सकाळी ही घटना घडली. याबाबत मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.
विरार पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करून मारहाण झालेल्या महिलांना ताब्यात घेऊन त्यांची जमावाच्या तावडीतून सुटका केली. याबाबत विरार पोलिस ठाण्यात संबंधित महिलांची चौकशी करून, त्यांची नोंद घेऊन त्यांना सोडण्यात आले.
संबंधित मारहाण झालेल्या चार महिला या यवतमाळ जिल्ह्यातील असून, नायगाव स्टेशनजवळील झोपडपट्टीत त्या राहतात. त्या मध गोळा करून तो विकून आपला उदरनिर्वाह चालवत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. विरार पूर्व, सहकारनगर येथील एका इमारतीत गुरुवारी (ता. २२) सकाळी या महिला मधविक्रीसाठी आल्या होत्या. त्यातील एक महिला ही इमारतीमध्ये गेली तर इतर तीन महिला इमारतीच्या खाली होत्या. अनोळखी महिला इमारतीत पाहून या महिला मुले चोरणाऱ्या टोळीतील असाव्यात, असा संशय व्यक्त करीत काही इमारतींमधील महिलांनी आरडाओरड केली. आजूबाजूला संतप्त जमाव जमला आणि त्यांना पकडून बेदम मारहाण केली.
ही बातमी विरार पोलिसांना कळली असता गुन्हे प्रकटीकरण प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन संतप्त जमावाच्या तावडीतून महिलांना सुखरूप बाहेर काढले. त्यांचे आधार कार्ड, रहिवासी पुरावे तपासले असता त्यांची ओळख पटली. यानंतर त्यांच्या चौकशीत त्या चोर नसून, मधविक्री करणाऱ्या असल्याचे स्पष्ट झाले. तशी नोंद घेऊन त्यांना सोडल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून, कायदा-सुव्यवस्था धोक्यात येईल असे कृत्य करू नये, असे आवाहन विरार पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com